कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील ग्रामीण भागात मोडणाऱ्या टिटवाळा येथील पाणी योजनेला २४ तास वीजपुरवठा करण्याचा निर्णय आयुक्त शंकर भिसे यांनी घेतल्याने टिटवाळा, मांडा परिसरला यापुढे मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे. येत्या तीस ते चाळीस दिवसांत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. सततच्या खंडित वीजपुरवठय़ामुळे या भागाला मुबलक पाणीपुरवठा करताना पालिकेला नागरिकांच्या रोषाला तोंड द्यावे लागत होते.
कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील टिटवाळा-मांडा परिसर हा महावितरणच्या ग्रामीण भागात येतो. या भागाला पालिकेकडून साडेसात दशलक्ष लीटर पाणीपुरवठा दररोज केला जातो. ग्रामीण भागात चार ते सहा तासांचे वीज भारनियमन असते. त्यामुळे पालिकेची टिटवाळ्यात पाणी सोडण्याची वेळ झाली की त्यावेळी नेमका भारनियमनामुळे वीज पुरवठा खंडित व्हायचा. गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून या भागात ही परिस्थिती होती. आता टिटवाळा परिसराचे नागरीकरण होत आहे. अनेक इमारती, घरांना पाणी साठवण्याच्या तळ टाक्या नसल्याने नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते.
टिटवाळा भागात बेसुमार अनधिकृत बांधकामे सुरू असल्याने चोरून पाणी वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. या पाणी चोरीचा सर्वाधिक त्रास प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या नागरिकांना होत आहे. हे अरिष्ट टाळण्यासाठी स्थायी समिती सभापती प्रकाश पेणकर, आयुक्त भिसे यांनी टिटवाळा पाणी योजनेला २४ तास वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. स्थायी समितीने हा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर मेसर्स एस. एस. इलेक्ट्रिकल्सने महावितरणचे गोवेली उपकर्षण केंद्र ते टिटवाळा पाणी पुरवठा या पाच किलोमीटरच्या अंतरात वीज वाहिनी टाकण्याचे काम हाती घेतले आहे. या नवीन वीज वाहिनीमुळे टिटवाळा भागात कितीही तास भारनियमन असले, वीजपुरवठा खंडित झाला तरी टिटवाळा पाणी योजनेचा वीजपुरवठा अखंड सुरू राहणार असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. अशा प्रकारचे वीजपुरवठय़ाचे एक्स्प्रेस व डबल फिडर डोंबिवली, नेतिवली आणि मोहिली येथे बसवण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा