डोंबिवली एमआयडीसीतील निवासी विभागातील रहिवाशांवर एक रुपयाची पाणी दरवाढ व औद्योगिक वापरासाठी अडीच रुपये पाणी दरवाढ करण्याचा निर्णय एमआयडीसीने घेतला आहे. निवासी
 विभागासाठी एक रुपया तर औद्योगिक विभागासाठी साडेचार रुपये मलनि:स्सारण कर आकारण्यात येणार आहे. १ मार्चपासून ही नवी दरवाढ लागू होणार आहे.
भूखंड विक्री, हस्तांतरणातून एमआयडीसीला कोटय़वधी रुपयांचा महसूल मिळतो. त्यामुळे रहिवाशांवर पाणी दरवाढ करू नये अशी मागणी डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनने एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे.
निवासी पाणी वापराचा दर सध्या सव्वा सात रुपये आहे तो सव्वा आठ रुपये, औद्योगिक वापरासाठी सध्याचा दर २० रुपये आहे तो २२ रुपये ५० पैसे होणार आहे. एमआयडीसी कल्याण-डोंबिवली पालिकेला सात रुपये दराने, ग्रामपंचायतींना साडेतीन रुपये दराने पाणी देत आहे. या तुलनेत निवासी विभागाचा पाणी दर जास्त असल्याचे असोसिएशनचे राजू नलावडे यांनी निवेदनात म्हटले आहे.
पर्यावरण संतुलन, प्रदूषण रोखण्यासाठी येथील सामाजिक संस्थांतर्फे झाडे लावणे, उद्याने विकसित करणे असे उपक्रम करतात. या उपक्रमांनाही एमआयडीसी निवासी दराप्रमाणेच पाणी दर आकारत असल्याने निवेदनात नाराजी व्यक्त केली आहे. येथील एका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या उद्यानाला मात्र सवलतीचा पाणी दर लावण्यात येत आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. एमआयडीसीने ही पक्षपातीची भूमिका बंद करावी. वाढीव पाणी दर करावेत अन्यथा नागरिकांचे आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे.
ही दरवाढ मुख्यालयातून केली जाते. हा धोरणात्मक निर्णय आहे, असे एमआयडीसी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.