उल्हास नदीतून ११७ एमएलडी पाणी उचलण्यास परवानगी
नवी मुंबई महापालिकेच्या कोटय़ातील सुमारे ११७ एमएलडी इतके पाणी आता कल्याण डोंबिवलीकरांना मिळणार आहे. मोरबे धरणाच्या निर्मितीमुळे नवी मुंबईला मिळणारा बारवी धरणातील पाण्याचा कोटा कल्याण, डोंबिवलीकरांना मिळाला, अशी येथील महापालिकेची मागणी होती. पालकमंत्री गणेश नाईक त्यासाठी अनुकूल नसल्यामुळे गेल्या अनेक वर्षांची ही मागणी पूर्ण होत नव्हती, अशी चर्चा होती. अखेर अतिरिक्त ११७ एमएलएडी इतके पाणी कल्याणकरांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्यामुळे येथील महापालिकेच्या दोन पाणी प्रकल्पांनाही संजीवनी मिळणार आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेचे दिल्लीतील जवाहरलाल नेहरू नागरी अभियानातून मोहिली तसेच तिसगाव टेकडी येथील सुमारे ३०० एलएलडी क्षमतेचे पाणी प्रकल्प हाती घेतले आहेत. या प्रकल्पांसाठी अत्यावश्यक असणारे २५० दशलक्ष लिटर पाणी एमआयडीसी व पाटबंधारे विभागाकडून उचलण्यास विधान भवनात झालेल्या एका बैठकीत मंजुरी देण्यात आली. उल्हास नदीतून हे पाणी उचलण्यात येणार आहे. यामुळे कल्याण डोंबिवलीत मुबलक पाणीपुरवठा होऊ शकणार आहे.
काँग्रेसचे आमदार संजय दत्त यांनी गेल्या विधिमंडळ अधिवेशनात कल्याण डोंबिवली शहराला वाढीव पाणीपुरवठा मिळण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्या वेळी उपसभापती वसंत डावखरे यांनी या पाणीप्रश्नाबाबत बैठक बोलविण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार बोलविण्यात आलेल्या बैठकीला पालकमंत्री गणेश नाईक यांच्यासह खासदार, आमदार तसेच वेगवेगळ्या पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. एमआयडीसीकडून कल्याण डोंबिवली पालिकेला मिळणारे ११७ दशलक्ष लिटर पाणी महापालिकेने उल्हास नदीतून स्वखर्चाने उचलावे. याबाबत महापालिकेने पाटबंधारे विभागाबरोबर करार करावा. पाण्याची वाढीव गरज भागविण्यासाठी एमआयडीसीने बारवी धरणातून ७५ दशलक्ष लिटर पाणी तसेच पाटबंधारे विभागाने ५० दशलक्ष लिटर पाणी महापालिकेला वर्ग करावे. याची कार्यवाही एक महिन्यात करून पुढील बैठकीत कार्य अहवाल ठेवण्यात यावा, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.
कल्याण- डोंबिवलीकरांना पाण्याचा दिलासा
उल्हास नदीतून ११७ एमएलडी पाणी उचलण्यास परवानगी नवी मुंबई महापालिकेच्या कोटय़ातील सुमारे ११७ एमएलडी इतके पाणी आता कल्याण डोंबिवलीकरांना मिळणार आहे. मोरबे धरणाच्या निर्मितीमुळे नवी मुंबईला मिळणारा बारवी धरणातील पाण्याचा कोटा कल्याण,
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-06-2013 at 08:17 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water relief to kalyan dombivli residents