कोटय़वधी रुपयांच्या अर्थसंकल्प मिरविणाऱ्या ठाणे महापालिकेला आता स्वत:च्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी सुरक्षारक्षकांची वानवा भासू लागली आहे. विशेष म्हणजे, शहरातील वेगवेगळ्या भागांत उभारण्यात आलेल्या जलकुंभांच्या संरक्षणासाठी पुरेसे सुरक्षारक्षक नसल्याची धक्कादायक माहिती पुढे येऊ लागली आहे. त्यामुळे शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभांसारख्या संवेदनशील ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात महापालिकेस अपयश आले असल्याने ठाण्यातील जलसाठे धोक्यात आले आहेत.
ठाणे महापालिकेच्या मालमत्तेमध्ये मुख्यालय, नऊ प्रभाग समित्यांची कार्यालये, नाटय़गृह, स्मशानभूमी, उद्याने, मोकळे भूखंड, जलकुंभ तसेच दवाखाने आदींचा समावेश असून त्यांच्या रक्षणासाठी महापालिकेने भांडुप येथील सुरक्षारक्षक मंडळाकडून दहा सुरक्षा पर्यवेक्षक तसेच ३६० सुरक्षारक्षक घेतले आहेत. मात्र, मालमत्तेच्या तुलनेत ही सुरक्षा व्यवस्था पुरेशी नसल्याचे उघड  होऊ लागले असून त्यामध्ये वाढ करण्याची आवश्यकता आहे.
ठाणे महापालिकेच्या हद्दीत सुमारे ५२ जलकुंभ असून त्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षकच नाहीत. त्यामुळे या जलकुंभांची सुरक्षा वाऱ्यावरच असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.
या संदर्भात महापालिकेच्या स्थायी समितीमध्येही सदस्यांनी विचारणा केली होती. तसेच या मुद्दय़ावरून प्रशासनास धारेवर धरले होते. मात्र, त्यानंतरही महापालिका प्रशासनाने सुरक्षारक्षकांमध्ये वाढ केलेली नाही, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.
ठाणे महापालिकेच्या ताफ्यात सध्या दहा सुरक्षा पर्यवेक्षक तसेच ३६० सुरक्षारक्षक आहेत. मात्र, त्यांचीही मुदत संपत आली असून त्यांना येत्या वर्षांसाठी महापालिका प्रशासनाकडून मुदत वाढवूनही मिळेल, पण पुरेशा सुरक्षा व्यवस्थेचे काय, असा प्रश्न महापालिकेसमोर पुन्हा उभा राहणार आहे. मुख्यालय, नऊ प्रभाग समित्यांची कार्यालये, नाटय़गृह, स्मशानभूमी, उद्याने, मोकळे भूखंड, जलकुंभ तसेच दवाखाने आदी मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी महापालिकेला सहा पर्यवेक्षक तसेच ४५४ सुरक्षारक्षकांची आवश्यकता आहे.
याशिवाय कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथे चार सुरक्षा पर्यवेक्षक तसेच ४६ सुरक्षारक्षकांची आवश्यकता आहे. एकंदरीत महापालिकेला स्वत:च्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी दहा सुरक्षा पर्यवेक्षक आणि पाचशे सुरक्षारक्षकांची आवश्यकता आहे. मात्र, महापालिकेच्या ताफ्यात सध्या दहा सुरक्षा पर्यवेक्षक आणि ३६० सुरक्षारक्षक आहेत. त्यामुळे महापालिकेला आणखी १४० सुरक्षारक्षकांची आवश्यकता आहे, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा