वार्षिक ७३ लाख लिटर्स पाण्याची बचत
राज्यातील दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर ठाणे येथील कॉसमॉस लॉज या वीस मजली इमारतीमध्ये पाणी बचतीसाठी ‘जल-क्रांती’ प्रकल्प राबविला आहे. या प्रकल्पांतर्गत स्वयंपाकगृह तसेच बाथरूमद्वारे वाहून जाणारे सांडपाणी प्रक्रिया करून पुन्हा वापरले जात आहे. प्रक्रिया केलेले हे पाणी पिण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी वापरता येऊ शकते, असा निर्वाळा प्रयोगशाळेने एका अहवालाद्वारे सोसायटीला दिला आहे.
कॉसमॉस बिल्डर्सचे संचालक सूरज परमार यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन ‘जल-क्रांती’ या प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. स्वयंपाकगृह तसेच बाथरूममध्ये ६० टक्के पाणी वापरले जात असून ‘जल-क्रांती’ या प्रकल्पामुळे त्या पाण्याचा पुनर्वापर होऊ शकतो. या प्रकल्पासाठी स्वयंपाकगृह तसेच बाथरूमचे सांडपाणी वाहून नेणाऱ्या जलवाहिन्यांसाठी तीन खणांची एक सेप्टिक टाकी जमिनीखाली बांधण्यात आली आहे. या टाकीच्या पहिल्या खणात जाड खडी, दुसऱ्या खणात कोळसा आणि तिसऱ्या खणात बारीक खडी किंवा वाळू ठेवण्यात आली. स्वयंपाकगृह तसेच बाथरूममधून येणारे सांडपाणी या तिन्ही खणांतून जेव्हा जाते तेव्हा त्या पाण्याचे शुद्धीकरण होते, अशी माहिती सूरज परमार यांनी या वेळी दिली. पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त या पाण्याचा वापर होऊ शकतो, असा अहवालही प्रयोगशाळेने दिला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच इतर कामांसाठी या पाण्याचा वापर करायचा नसेल तर ते पाणी रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या भूमिगत टाकीतही सोडता येऊ शकते, त्यामुळे जमिनीखाली पाण्याची पातळी वाढू शकते तसेच कूपनलिकेद्वारेही पाणी चांगले उपलब्ध होते, असेही त्यांनी सांगितले.
ठाण्यातील मानपाडा भागात असलेल्या कॉसमास लॉज या वीस मजली इमारतीमध्ये ‘जल-क्रांती’ हा प्रकल्प राबविण्यात आला. या इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर ????? आठ बाथरूम आणि सहा बाथरूम ????? असून यामधून दिवसाला वीस हजार लिटर पाणी वाया जात होते. मात्र ‘जल-क्रांती’ प्रकल्पामुळे आता या पाण्याची बचत होऊ लागली असून त्याचा पुनर्वापर होऊ लागला आहे. तसेच या प्रकल्पामुळे वर्षांकाठी ७३ लाख लिटर पाण्याची बचत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांनी ‘ग्रे वॉटर सिस्टीम’ या नावाने ही योजना सुरू केली आहे. तसेच या प्रकल्पामध्ये नैसर्गिकरीत्या पाण्याचे शुद्धीकरण होत असल्याने त्यासाठी वीज लागत नाही. त्याचप्रमाणे या प्रकल्पासाठी सुमारे २५ ते ७५ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो, असेही त्यांनी सांगितले.
..तर २१ हजारांचे पारितोषिक
‘जल-क्रांती’ योजना अमलात आणणाऱ्या पहिल्या १०० सोसायटींना कै. रमेश परमार ट्रस्टकडून २१ हजारांचे पारितोषिक देण्यात येईल, असेही सूरज परमार यांनी जाहीर केले.
मालमत्ता करात सूट द्यावी
ठाणे महापालिकेचे महापौर हरिश्चंद्र पाटील, अतिरिक्त आयुक्त श्यामसुंदर पाटील तसेच लोकप्रतिनिधी आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी यांनी ‘जल-क्रांती’ प्रकल्पाची पाहणी केली. अशा प्रकारची योजना राबविणाऱ्या सोसायटय़ांना एक वर्षांसाठी मालमत्ता करात सूट द्यावी, अशी मागणी या वेळी सूरज परमार यांनी केली. त्यावर येत्या सर्वसाधारण सभेत या संबंधीचा प्रस्ताव मांडून निर्णय घेऊ, असे आश्वासन महापौरांसह लोकप्रतिनिधींनी दिल्याचे त्यांनी सांगितले.  
एमसीएचआयचे आवाहन
शहरात नव्याने उभ्या राहत असलेल्या गृहसंकुलांमध्येही ‘जल-क्रांती’चा प्रकल्प राबवून पाणी बचत करावी, असे आवाहन एमसीएचआयचे अध्यक्ष शैलेश पुराणिक यांनी या वेळी बांधकाम व्यावसायिकांना केले. तसेच शहरातील सहा ते सात बांधकाम व्यावसायिकांनी हा प्रकल्प हाती घेतला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा