कामोठे वसाहतीमधील नागरिकांना २४ तास पाणी मिळत नसल्याने येथील गृहिणींना पाण्याचे नियोजन करून कुटुंबाचा गाडा चालवावा लागत आहे. कामोठे वसाहतीची तहान भागविण्यासाठी ४५ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याची आवश्यकता असताना येथे २८ एमएलडी पाणी पाणीपुरवठा केला जातो. सिडको वसाहतींमध्ये पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची (एमजेपी) आहे. गेल्या सहा महिन्यांपासून एमजेपीकडे कामोठे वसाहतीसाठी पाणी पुरवठय़ामध्ये वाढ करण्याची मागणी सिडकोने करूनही एमजेपीने पाणी पुरवठय़ामध्ये वाढ केलेली नाही. त्यामुळेच वसाहतीचा पाणी प्रश्न पेटला आहे.
कामोठे वसाहतीमध्ये सुमारे ६५० गृहनिर्माण संकुले आहेत. सिडकोकडे कमी पाणी असल्यामुळे या संकुलांना २४ तास पाणी पुरवठा करण्याऐवजी सकाळी ७ ते रात्री नऊ वाजेपर्यंत पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे वसाहतीचे पाणी वाटपाचे गणित चुकल्याचे नागरिक बोलतात. नवी मुंबईत मिळणाऱ्या २४ तास पाण्यामुळे येथे स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांचे प्रमाण अधिक आहे. मात्र येथील पाणी पुरवठा निम्म्याने होत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. नागरिकांना किमान पाण्यासारखी पायाभूत सुविधा मिळावी यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी नुकतीच सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांची भेट घेतली. भाटिया यांनी आमदार ठाकूर यांच्यासमोरच मुख्य अभियंत्यांना कामोठेसाठी वाढीव पाणी पुरवठा करावा, असे आदेश दिले. मात्र स्वत: भाटिया यांनी एमजेपीकडे पाणी पुरवठय़ामध्ये वाढ करण्यासाठी याअगोदरच अनेक दूरध्वनी केल्याची विश्वसनीय माहिती सिडकोच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. एमजेपीने कामोठे वसाहतीसाठी ५ एमएलडी पाण्याची वाढ करण्याचे संकेत याआधीच सिडकोला दिले आहेत. मात्र ही वाढ प्रत्यक्षात कधी होते याच्या प्रतीक्षेत सिडकोचे पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी आहेत. कामोठेवासीयांची तहान भागविण्यासाठी ४५ एमएलडीची गरज आहे. कामोठे वसाहतीचे पाण्याचे ऑडिट करून वाढत्या लोकसंख्येनुसार पाणी क्षमतेमध्ये वाढ करावी अशी मागणी कामोठेवासीयांची आहे.

Story img Loader