भूपृष्ठाखालील पाण्याचा मोठय़ा प्रमाणात उपसा झाल्यामुळे मागील ५ वर्षांच्या तुलनेत पाणीपातळीत मोठी घट झाल्याची आकडेवारी आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत नांदेड विभागांतर्गत ३२ साखर कारखान्यांनी ६७ लाख ७ हजार २७१ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. एकीकडे पिण्याच्या पाण्याची ओरड, तर दुसरीकडे शिवारात मोठय़ा प्रमाणात उसाचे पीक असे हंगामातील आकडेवारी सांगते.
जानेवारीत निरीक्षण विहिरीच्या माध्यमातून नोंदविलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्य़ातील पातळी साडेसहा मीटरने घटली. पारंपरिक पीकपद्धती व प्रवाही सिंचनाद्वारे दिले जाणारे पाणी यामुळे पाण्याचा उपसा मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. याचा पाणीपातळीवर मोठा परिणाम झाला. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी निरीक्षण विहिरीतून नोंदविलेली आकडेवारी धक्कादायक आहे. जिल्ह्य़ातील आठही तालुक्यांत पाणीपातळी सरासरी साडेसहा मीटरने घटली. जिल्ह्य़ात सर्व तालुक्यांतील पाणीपातळी पुढीलप्रमाणे – (कंसातील आकडे घट दर्शविणारे) उस्मानाबाद १०.७५ मीटर (५), तुळजापूर १०.६५ (६.०४), उमरगा १०.५६ (६.०६), लोहारा ११.०८ (५.३९), कळंब १०.०१ (५.०६), भूम १०.८१ (६.३८), वाशी ११.५३ (६.९८) व परंडा १०.८२ मीटर (४.८२). उस्मानाबाद जिल्ह्य़ाची ही आकडेवारी मराठवाडय़ातील इतर भागामधील पाण्याची स्थिती दर्शविण्यासाठी पुरेशी आहे. या स्थितीतही उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड व हिंगोली या ४ जिल्ह्य़ांतील ३२ साखर कारखान्यांचे हंगाम मात्र यंदा वेगात सुरू आहेत. या कारखान्यांनी ६ फेब्रुवारीअखेर ६७ लाख ७ हजार २७१ मेट्रीक टन उसाचे गाळप केले. सरासरी साखर उतारा १०.५२ टक्के आहे. परभणी जिल्ह्य़ातील ५ कारखान्यांनी १४ लाख ७५ हजार मेट्रिक टन गाळप करून ११ लाख ५६ हजार ७९० क्विंटल साखर निर्माण केली. हिंगोलीत ३ कारखान्यांनी ६ लाख २५ हजार मेट्रिक टन गाळप केले. यंदा नांदेड विभागात सर्वात कमी पाऊस उस्मानाबादेत पडला. पिण्याच्या पाण्याची सर्वत्र ओरड आहे. त्यासाठी ७३१ खासगी विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. या शिवाय १४५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. दुसरीकडे ९ कारखाने मोठय़ा प्रमाणात गाळप करीत आहेत. या कारखान्यांतून आजपर्यंत २० लाख २५ मेट्रिक टन गाळप करण्यात आले. यातून २० लाख ४६ हजार ८५५ क्विंटल साखर तयार झाली. उस्मानाबादच्या तुलनेत लातूर जिल्ह्य़ात यंदा बऱ्यापैकी पाऊस झाला. सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी असला, तरी ११ कारखान्यांनी आतापर्यंत २० लाख ७५ हजार मेट्रिक टन गाळप करून २४ लाख ८२ हजार ५१० क्विंटल साखर तयार केली. पाण्यासाठी ओरड होत असताना, एवढय़ा मोठय़ा प्रमाणात उसाचे क्षेत्र असल्याने पिण्याच्या पाण्यापेक्षा शेतीसाठी पाण्याचा अमर्याद होणारा वापर यातून अधोरेखित होतो. आजही पारंपरिक पद्धतीने शेती केली जात असून प्रवाही सिंचन पद्धतीमुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. पिकाला पाण्याची गरज किती, याचे ज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात केले नसल्याने ही स्थिती ओढवली असल्याचे तज्ज्ञांचे अहवाल सांगतात. मात्र, याकडे कोणीही गांभीर्याने पाहत नसल्याचे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा