प्रमुख उद्योगांच्या पाणी कपातीचा मुद्दा विचाराधीन
यंदाच्या उन्हाळ्यात ४५० गावांना सोसावी लागणारी पाणी टंचाईची झळ बघता प्रमुख उद्योगांच्या पाणी पुरवठय़ात कपात करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन गांभीर्याने विचार करत आहे. त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या असून वर्धा नदीवरून पाण्याची उचल करणाऱ्या बहुतांश उद्योगांना उन्हाळ्यात पाण्याची झळ सोसावी लागणार आहे.
 औद्योगिकदृष्टय़ा प्रगत या जिल्ह्य़ातील बारमाही नद्यांचे पात्र सातत्याने कोरडे पडत आहे. त्याला कारण या जिल्ह्य़ातील उद्योगांकडून नदीच्या पात्रातून मोठय़ा प्रमाणात पाण्याची उचल होत आहे. नेमकी हीच बाब आता जिल्हा प्रशासनाच्या अंगलट आली असून यंदाच्या उन्हाळ्यात तब्बल ४५० गावांना पाणी टंचाईची तीव्र झळ सोसावी लागणार आहे. यातील बहुतांश गावे वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, इरई, उमा नदीच्या काठावरील आहेत. वर्धा नदीवरून सर्वाधिक वीस उद्योग २०१.५७९ दलघमी पाण्याची उचल करतात. त्यात वर्धा पॉवर ४२.१५ दलघमी, नागपूर एनर्जी इन्फ्रा ४२ दलघमी, नारंडा येथील मुरली अ‍ॅग्रो १९.२३, बीएस इस्मात १०, शालिवाहन कंस्ट्रक्शन १० दलघमी, यासोबतच एसीसी, अल्ट्राटेक, अंबूजा, बिल्ट या मोठय़ा उद्योगांकडूनही पाण्याची उचल होत आहे. त्यामुळे वर्धा नदी अक्षरश: कोरडी पडली आहे. याच नदीच्या काठवरील जवळपास शंभर गावांना यंदाच्या उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईची झळ सोसावी लागणार आहे. त्या पाठोपाठ ईरई नदीचे पात्र पूर्णत: कोरडे पडले आहे, तर वैनगंगा व पैनगंगाची पाणी पुरवठय़ाची क्षमताही कमी होत चालली आहे.
यंदाच्या उन्हाळ्यातील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता नदी काठावरील गावकऱ्यांनी आतापासूनच ओरड करायला सुरुवात केलेली आहे. गावातील महिला शेकडो मैल अंतर पायी तुडवून पाणी आणतात. जिवती, कोरपना, राजुरा, भद्रावती व चंद्रपूर या चार तालुक्यात तर यंदा भीषण पाणी टंचाईचे चित्र आहे. ही परिस्थिती लक्षात घेता गावकऱ्यांनी गेल्या वर्षीच उद्योगांचा पाणी पुरवठा उन्हाळ्यात निम्म्यावर आणण्याची मागणी लावून धरली होती, मात्र तेव्हा जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केले होते, परंतु यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत परिस्थिती अतिशय भयावह असल्याने सिंचन विभाग व जिल्हा प्रशासनाने आतापासूनच उद्योगांच्या पाणी पुरवठय़ात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या किंवा मार्चच्या पहिल्या आठवडय़ापासूनही उद्योगांनी या निर्णयाची अंमलबजावणी केली तर गावातील लोकांना पिण्याचे पाणी मिळेल अन्यथा, गावकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे इतकी वाईट परिस्थिती गावात आतापासूनच बघायला मिळत आहे. केवळ गावातच नाही तर शहरातील बहुतांश भागांना सुध्दा टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे एमआयडीसी व तेथील उद्योगांचा पाणी पुरवठा उन्हाळ्यापुरता कपात करण्याची मागणी समोर आलेली आहे.
धारीवाल इन्फा्रॅस्ट्रक्चरने तर वर्धा नदीच्या पात्रात विहीर खोदून पाण्याची उचल सुरू केली आहे. संभाव्य टंचाई परिस्थिती लक्षात घेता या उद्योगालाही पाण्याचा वापर जपून करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. तिकडे पाणी पुरवठय़ात कपात केली तर त्याचा परिणाम उत्पादनावर होईल, अशी ओरड उद्योगांनी आतापासूनच करायला सुरुवात केली आहे. बिल्ट, एसीसी, अल्ट्राटेक या उद्योगांकडून वर्धा नदीतून सर्वाधिक पाण्याची उचल केली जाते. त्यासोबतच बहुतांश गावातील नळ योजना याच वर्धा नदीवर आहे, तसेच एमआयडीसी, चांदा आयुध निर्माणी, चंद्रपूर शहर, भद्रावती, वरोरा, राजुरा व बल्लारपूर या प्रमुख शहरांनाही वर्धा नदीच्या पात्रातून पाणी पुरवठा होतो. गावांसोबतच शहरांनाही पाणी टंचाईची झळ सोसावी लागू नये म्हणून आतापासूनच प्रशासनाने उद्योगांना तसे निर्देश देणे सुरू केलेले आहे. यंदाच्या उन्हाळ्यात जवळपास २५ टॅंकरने पाणी पुरवठा करावा लागणार आहे. त्यामुळे टंॅकरची व्यवस्था मार्चमध्येच करून ठेवण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहे. उद्योगांनी पाण्याचा जपून व काळजीपूर्वक वापर केला तर संभाव्य पाणी टंचाईवर मात करणे सहज शक्य आहे. अन्यथा, या शहराचाही मराठवाडा होण्यास वेळ लागणार नाही अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे.
दूषित पाणी पुरवठा
शहरात भूमिगत गटार योजनेसाठी अंतर्गत व मुख्य रस्त्यांचे खोदकाम सुरू असल्याने नळाची पाईप लाईन ठिकठिकाणी फुटलेली आहे. त्याचा परिणाम शहररातील बहुतांश प्रभागात दूषित पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे लोकांना पोटाचे विकार, कावीळ व इतर आजार होत आहेत. हा दूषित पाणी पुरवठा त्वरित बंद करावा अशी मागणी लोकांनी केली आहे.