विक्रमी पाऊस होऊन एक महिना उलटत नाही तोच बदलापूरमधील बहुतेक भागात तीव्र पाणीटंचाई भेडसावत असून काही ठिकाणी तर टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. या संदर्भात शहरवासीयांनी जीवन प्राधिकरणाकडे वारंवार अर्ज-विनंत्या करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप कात्रप-शिरगांव जलसमस्या निवारण समितीचे समन्वयक संभाजी शिंदे यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंबरनाथ विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना एक पत्र लिहिले असून त्यात शहरात भेडसाविणाऱ्या अनियमित पाणीपुरवठय़ाच्या समस्येचा पाढा वाचण्यात आला आहे. बदलापूर शहरात सध्या शासनाच्या सुवर्णजयंती नागरी नगरोत्थान अभियानातून ८० कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. मात्र या योजनेच्या तांत्रिक बाबी आणि आराखडय़ाबाबत नागरिक अनभिज्ञ आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी जाहीर सभा घेऊन नागरिकांना ही योजना समजावून सांगावी, तसेच अंमलबजावणीपूर्वी नागरिकांच्या सूचना विचारात घ्याव्यात, असे आवाहनही या पत्रात करण्यात आले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून बदलापूरमधील कात्रप, नवीन डीपी रोड परिसर, चैतन्य संकुल, भय्या चाळ, कार्मेल हायस्कूल, गणेश घाट आदी परिसरातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे.

Story img Loader