तीव्र टंचाई व शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघूर धरणातील पाण्याची खालावलेली पातळी पाहता जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांनी शहरात तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. तथापि महापौर किशोर पाटील यांनी या निर्णयात बदल करीत दोन दिवसाआडच पाणी पुरवठा सुरू राहणार असल्याचे म्हटले आहे.
शहराला टंचाईची झळ पोहोचणार नाही तसेच पाण्याची कमी पडू देणार नाही असे आश्वासन देणाऱ्या महापौर पाटील यांनी तापी पाटबंधारे विभाग, महापालिका पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांसह वाघूर धरणाला भेट देऊन शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या प्रस्तावित योजनेची पाहणी केली.  धरणात सद्यस्थितीत शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी फक्त दोन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने मृतसाठय़ातून
पाणी घेण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष योजनेचे काम त्वरित पूर्ण करावे अशा सूचना महापौर पाटील यांनी यावेळी दिल्या. नवीन चार पंपाद्वारे प्रति तास सुमारे २८ लाख लिटर पाणी उपलब्ध होणार असून त्यातून शहरास मुबलक व उच्च दाबाने पाणी पुरवठा करणे सुकर होणार असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.

Story img Loader