निवडणुकीची धामधूम संपताच कल्याण, डोंबिवली शहरातील नागरी समस्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून गेल्या तीन दिवसांपासून शहरातील वेगवेगळ्या भागांत तीव्र अशी पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
उन्हाच्या झळा वाढू लागल्याने पाण्याची मागणीही वाढू लागली आहे. या वाढत्या मागणीमुळे पाण्याचे टँकर नेमके कोणत्या भागात पुरवायचे, असा प्रश्न महापालिका प्रशासन तसेच नगरसेवकांना पडला आहे. डोंबिवली तसेच आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांना मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा पुरवठा सुरू असताना अधिकृत घरांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे चित्र आहे.
सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. तसेच अनेक भागांमध्ये महाराष्ट्र दिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या पाश्र्वभूमीवर मोहिली आणि नेतिवली येथील जलवाहिनीत बिघाड झाल्याने शहरातील अनेक भागांमधील पाणीपुरवठा ठप्प झाल्याचे सांगण्यात येते. शहरात पाणी नसल्याने नागरिकांनी नगरसेवकांकडे तक्रारींचा ओघ सुरू केला आहे. पाटबंधारे विभागाच्या शटडाऊनमुळे दर मंगळवारी महापालिकेला बारवी धरणातून होणारा पाणीपुरवठा बंद केला जातो. यामुळे डोंबिवली शहरात बुधवारी पाणी येत नाही. असे असताना डोंबिवली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोहिली येथील पाणीपुरवठा उदंचन योजनेची एक वाहिनी बिघडली. त्यामुळे बुधवारी रात्री तसेच गुरुवारी सकाळी डोंबिवली शहर व कल्याण पूर्वेतील अनेक भागांना पाणीपुरवठा झाला नाही.
या भागांना नेतिवली टेकडीवर नव्याने बांधलेल्या पाणीयोजनेतून पाणीपुरवठा केला जातो. या पाणीयोजनेत मोहिली येथून पाणी आले नाही. त्यामुळे डोंबिवली तसेच कल्याणच्या काही भागांना रात्रीपासून पाणीपुरवठा झाला नाही, असे कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा यांनी सांगितले. गुरुवारी सकाळपासून मोहिली येथील वाहिनी दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम पूर्ण करून गुरुवारी दुपारी बारा वाजल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे जुनेजा यांनी स्पष्ट केले.