‘ओसीडब्ल्यू’ कार्यालयासमोर ‘मटका फोड’ आंदोलन
चोवीस तास पाणी मिळेल इतका पाण्याचा साठा उपलब्ध असल्यामुळे नागरिकांना चोवीस तास मिळेल, अशी घोषणा महापालिकेने केल्यानंतर शहरातील विविध भागात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. जून महिन्यातही नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. गेल्या आठ दिवसांपासून विविध वस्त्यांमध्ये पाणी मिळत नसल्याने नागरिक आता प्रशासन आणि नगरसेवकांवर रोष व्यक्त करीत आहेत. ‘ओसीडब्ल्यू’च्या कार्यालयासमोर नागरिकांनी मंगळवारी ‘मटका फोड’ आंदोलन केले.
मे महिन्यानंतर पाणी समस्येवर तोडगा निघून नागरिकांना भरपूर पाणी मिळेल अशी अपेक्षा असताना गेल्या आठ दिवसापासून वाढते तापमान बघता शहरातील विविध भागात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. टँकरचालकांकडे मागणी केली जात असताना ते वेळेवर पोहोचत नाही. ज्या ठिकाणी पोहोचले तिथे नागरिकांकडून पैसे घेत असल्याच्या तक्रारी आहेत. पूर्व, मध्य आणि दक्षिण नागपुरातील अनेक वस्त्यांमध्ये सकाळच्यावेळी एक तास पाणी पुरवठा होत असल्यामुळे अनेकांनी पाणी मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.
शहरातील पाणी समस्या बघता आयुक्तांनी नुकतीच बैठक आयोजित करून ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍सच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना जाब विचारला. उन्हाळा लांबल्याने पाणी प्रश्न अधिक तीव्रतेने जाणवू लागला आहे. अनेक नागरिकांना गरजेऐवढे पाणी मिळत नाही. नागरिक आणि नगरसेवकांच्या तक्रारींमध्ये सातत्याने भर पडत आहे. टँकरद्वारे पाणी पुरवठय़ासंदर्भात सर्वाधिक बोंब सुरू आहे. मागणीनुसार टँकर पाठविले जातात. मात्र, ते संबंधित ठिकाणी पोहोचत नाही. नगरसेवकांनी मागणी केली तरी टँकर मिळत नाही, अशी अवस्था झाली आहे. ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍सने शहरातील विविध भागात पाईप लाईन टाकण्यासाठी खोदकाम केले असून त्यात काही गडर लाईन फुटल्या आहेत त्यामुळे घाण पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळले जात असल्यामुळे नागरिकांनी त्या संदर्भात अनेक तक्रारी केल्या आहेत. मात्र, ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात कुठलीच कारवाई केली नाही. दिवसेंदिवस पाण्याची समस्या वाढत असताना नागरिकांचा रोष वाढत चालला आहे. महापालिका प्रशासनाने ओसीडब्ल्यूवर पाणी पुरवठय़ाची जबाबदारी दिल्यामुळे महापालिकेचे अधिकारी नागरिकांना ओसीडब्ल्यूकडे पाठवतात. ओसीडब्ल्यूचे अधिकारी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेत नाही त्यामुळे गेल्या आठवडय़ात म्हाळगीनगर, लकडगंज भागात नागरिकांनी निदर्शने केली.
शहरातील पाणी समस्या बघता प्रत्येक झोनमध्ये ३ या प्रमाणे ३० टँकर महापालिका उपलब्ध करून देणार आहे. झोन पातळीवरील प्रतिनिधी ओसीडब्ल्यूकडून होणाऱ्या पाणी पुरवठय़ावर लक्ष ठेवतील आणि पाणी न पोहोचलेल्या ठिकाणी या टँकरद्वारे पुरवठा करतील. प्रत्येक फेरीमागे १० पटीने दंडाची वसुली ओसीडब्ल्यूकडून करण्यात येईल, असे निर्देश वर्धने यांनी दिले. बल्क मॅनेजमेंट योग्य पद्धतीने होत नसल्याने जलकुंभ भरत नाही. त्याचा परिणाम पाणी वितरणावर होत आहे. या संदर्भात जलप्रदाय समितीचे सभापती सुधाकर कोहळे यांनी सांगितले, शहरात भरपूर पाणी आह.े मात्र, त्याचा उपयोग होत नाही. ओसीडब्ल्यूच्या नियोजन शुन्यतेमुळे शहरात पाणी समस्या गंभीर झाली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे. ओसीडब्ल्यूकडून पाण्याच्या संदर्भात हयगय करण्यात येत असल्याने कंपनीविरुद्ध तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी कोहळे यांनी केली. पाण्याच्या समस्येवरून आयुक्त श्याम वर्धने आणि पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत पाणी पुरवठा करणाऱ्या ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍स कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. शहरातील पाणी प्रश्न हाताळण्यासाठी शशिकांत हस्तक यांची विशेष कार्यासन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा