गोंदिया जिल्ह्य़ात मागील वर्षीच्या तुलनेत पाऊस कमी झाला. तरीही जिल्ह्य़ात पाणी टंचाई जाणवणार नसल्याचा अहवाल भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने जिल्हाधिकारी कार्यालयाला सोपविला असला तरी जिल्ह्य़ातील २६८ गावे व १८७ वाडय़ांना पाणीटंचाईचा कमालीचा फटका बसणार आहे. या गावात प्राथमिक उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासन कामाला लागले असून उन्हाळा तीव्र होण्यापूर्वी टंचाई निवारण्याकरिता धावपळ सुरू झाली आहे. शासनाचे तहान लागल्यावर विहीर खोदण्याचे प्रयत्न लक्षात घेता यंदाही गावकरी मोच्रे, निदर्शने करण्याची शक्यता आहे.
गोंदिया जिल्हा आश्वासित पर्जन्यमानाच्या क्षेत्रात येत असल्याने पावसाची सिंचन क्षमता इतर जिल्ह्य़ाच्या तुलनेत कमी आहे. यावर्षीच्या पावसाच्या तुलनेवरून टंचाईची स्थिती काढण्यात आली. या पावसाळ्यात १२३३.१४ मि.मी. पावसाची नोंद झाली. हा पाऊस सिंचन क्षमता आणि भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करण्यायोग्य असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला भूजल सर्वेक्षण विभागाने दिला. त्यामुळे भीषण टंचाई जाणवणार नसल्याचेही सांगण्यात आले; परंतु जिल्ह्य़ातील १६४७ गावांपकी २६८ गावे व १८७ वाडय़ा, अशा एकूण ४५५ गावांना तीव्र पाणी टंचाई जाणवणार आहे. एप्रिल ते जूनमधील उन्हाळ्याची तीव्रता पाहता २६ जानेवारीला पाणीपुरवठा राज्यमंत्री रणजित कांबळे यांच्या सभेत जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने टंचाई निवारणार्थ १ कोटी २५ लाख २१ हजार रुपयांच्या अपेक्षित खर्च मांडला होता. त्यामुळे नेमका जिल्ह्य़ाला किती निधी निवारणार्थ मिळतो आणि अंमलबजावणी कशी होते, याचा उलगडा आगामी काळातच होणार आहे.