जनतेच्या सोयीसाठी पाणीटंचाईवर कोटय़वधीचा खर्च केला जात असला, तरी प्रशासकीय यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे अनेक गावे तहानलेलीच आहेत. पाणीटंचाईच्या कामात हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा इशारा माजी मंत्री आमदार जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिला. दरम्यान, पाणीटंचाईच्या प्रश्नावरील बैठकीचे निमंत्रण न दिल्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बहिष्कार घालून निषेध केला.
औंढा नागनाथ पंचायत समिती सभागृहात सोमवारी आमदार दांडेगावकर व राजीव सातव यांच्या उपस्थितीत पाणीटंचाईसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. पाणीटंचाईच्या प्रश्नावर आमदारांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. पंचायत समिती सभागृहातील बैठकीचे निमंत्रण पत्र न दिल्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध केला. दांडेगावकर म्हणाले की, या वर्षी जिल्ह्य़ात सर्वत्र कमी पाऊस झाल्याने पाणीटंचाईचा प्रश्न चांगलाच तीव्र होणार आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी आतापासूनच त्याचे नियोजन करणे आवश्यक आहे.
ज्या भागातील विहिरी, बोअर अधिग्रहण करण्याची गरज आहे, त्याचे प्रस्ताव परिपूर्ण करून तत्काळ पाठवावेत. पाणीटंचाईचा मुकाबला करण्यासाठी नियोजनबद्ध टंचाई आराखडा तयार करून मंजुरीसाठी येत्या बैठकीत ठेवा, अशा सूचना केल्या. आमदार सातव यांनी अशाच सूचना करून नियोजनाच्या कामाला लागा, असा आदेश दिला.

Story img Loader