दारणा व गोदावरी समुहातून जायकवाडीसाठी सोडलेले तीन टीएमसी पाणी बिगर सिंचनात धरुन उर्वरीत पाण्यातून शेतीसाठीचे नियोजन करावे असा महत्वपूर्ण ठराव राहाता येथील गोदवारी उजवा कालवा पाणी वाटप सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आला. धरणातील सध्याच्या पाणी साठय़ाची आकडेवारी लक्षात घेवून रब्बीसाठी एक व उन्हाळी हंगामासाठी एक यानुसार शेतीसाठीचे आवर्तन देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक म्हस्के, राहाता उपविभागाचे सहाय्यक अभियंता राजेंद्र नंदनवार, आमदार भाऊसाहेब कांबळे, राहात्याचे नगराध्यक्ष कैलास सदाफळ, गणेश कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड.नारायणराव कार्ले, गंगाधर चौधरी, शिवाजी वाघ, रावसाहेब देशमुख, तहसीलदार आप्पासाहेब िशदे, गटविकास अधिकारी कमलाकर रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते.
गोदावरी व दारणा समूहातील धरणांमध्ये गेल्या वर्षांच्या तुलनेत सहा टीएमसी पाणी साठा कमी आहे. नाशिक शहर, औष्ण्णिक केंद्र व उद्योगासाठी पाण्याचे आरक्षण असुन उर्वरीत पाण्यात शेतीसाठीचे नियोजन करावे लागणार असल्याने आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यासाठी गोदावरी कालव्यातून शेतीसाठी व पिण्यासाठी एकाचवेळी आवर्तन सोडून पाण्याचा नाश टाळावा असे मत मंत्री विखे यांनी केले. गोदवरी धरण समूहातील धरणांवर बिगर सिंचनाचे आरक्षण जवळपास ३० ते ४० टक्क्यांवर गेलेले आहे, त्यात कपात करुन ते पाणी शेतीला दिले पाहीजे.
जायकवाडी धरणात तीन टीएमसी पाणी सोडल्यामुळे शेतीच्या आवर्तनास दोन महिने उशीर झाला आहे. सध्याची भीषण पाणी टंचाई लक्षात घेता पुढील वर्षी अनेक कारखान्यांचे बॉयलर पेटणार नाहीत. तेव्हा आहे ती उभी पिके जगविण्यासाठी पाटबंधारे अधिकाऱ्यांनी पाण्याचे सुयोग्य नियोजन करुन शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे.
पहिले आवर्तन सोडतांना वितरिकांची दुरुस्ती करुन लवकरात लवकर सोडण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.पहिले आवर्तन २२०० दशलक्ष घनफुटाने सोडवून नंतर पुढील तिसरे आवर्तन देणे शक्य आहे का याचा विचार पाटबंधारे विभगाचे विचार करुन निर्णय घ्यावा असे मंत्री विखे यांनी सांगितले.

Story img Loader