राज्यातील ९ जिल्ह्य़ातील ११५ तालुक्यात भीषण दुष्काळाचे भयावह चित्र आहे. दुष्काळ निवारण, तसेच पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाण्याचा थेंब न् थेंब अडविणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी जलसंधारण, नदीनाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरण, सरळीकरण या कामांसाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन राज्याचे कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
ते अमडापूर येथे ९ कोटी ५६ लाख रुपये खर्चाच्या पाणलोट कामांचा शुभारंभप्रसंगी बोलत होते. ते म्हणाले की, पाणलोट विकास कार्यक्रमाअंतर्गत जलसंधारणाची भरपूर कामे झाली तर पर्याप्त पाण्याची उपलब्धता होईल. सध्या संपूर्ण राज्यात सुमारे ५ लाख पशुधनासाठी चारा छावणीची व्यवस्था शासनाने केली असून छावणीसाठी लोकांनीही पुढाकार घेतला पाहिजे. जलसंधारण, नाले सरळीकरण इत्यादी कामासाठी लागणारा संपूर्ण इंधनाचा खर्च शासन देणार असून शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकार बुलढाणा जिल्हा बॅंकेस मदत करणार आहे. शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात लवकरच मुंबई येथे बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कृषिमंत्री विखे पाटील यांनी चिखली तालुक्यातील हातणी या गावात जाऊन भगीरथ जलसंजीवनी प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. पळसखेड भट ते उतरादा पेठ या २३ कि.मी. अंतराच्या राम नदीवरील शिरपूर पॅटर्न जलसंधारण कामाअंतर्गत नदीपात्राजवळील ९ गावे कायमस्वरूपी टॅंकरमुक्त करण्यात येणार आहेत. पाण्याची पातळी वाढविणारा लोकसहभागातून निर्माण होत असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी भूवैज्ञानिक पालनदास घोडेस्वार मार्गदर्शन करीत आहेत. प्रत्येक किलोमीटरवर पाणी साठवण बंधारा अशा पध्दतीचा हा जिल्ह्य़ातील जलसंधारणाचा पहिलाच प्रकल्प आहे. हा प्रकल्प यशस्वी करावा, असे आवाहन राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water storage is necessary to fight against drought