दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर मराठवाडा विभागात पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या १ हजार ४८ गावे व ५३४ वाडय़ांना १ हजार २९२ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी विभागातील २ हजार ६६१ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. गत सप्ताहाच्या तुलनेत टँकरची संख्या ११०ने वाढली आहे.
औरंगाबाद जिल्हय़ात २७६ गावे व ६ वाडय़ांना ३६९ टँकरने, जालना २४० गावे व ७१ वाडय़ांना ३०८ टँकरने, परभणी ३ गावांना ३ टँकरने, नांदेड ४५ गावे व १७ वाडय़ांना ८२ टँकरने, बीड २९३ गावे व ४२५ वाडय़ांना ३३२ टँकरने, तसेच उस्मानाबाद ११० गावे व १२ वाडय़ांना १९८ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
१०५ चारा छावण्या
टंचाई स्थितीच्या पाश्र्वभूमीवर विभागात १०५ चारा छावण्या सुरू केल्या आहेत. या छावण्यांमध्ये ९६ हजार १५४ जनावरे आहेत. औरंगाबादच्या ११ छावण्यांमध्ये ५ हजार ६६२ जनावरे, जालन्यातील ४३ छावण्यांमध्ये १७ हजार ३५९, बीडमध्ये ४२ छावण्यांत ६४ हजार ९९७ व उस्मानाबादच्या ९ छावण्यांमध्ये ८ हजार १३६ जनावरांचा समावेश आहे.
रोहयोच्या कामावर ४५ हजार मजूर
औरंगाबाद विभागात रोजगार हमी योजनेची सुमारे ३ हजार ६२ कामे सुरू असून, त्यावर ४५ हजार ७४४ मजूर काम करीत आहेत. दि. ११ ते १६ मार्च दरम्यान विभागात ४४ हजार ७३० मजूर कामावर होते. दि. १८ ते २३ मार्च दरम्यान ही संख्या ४५ हजार ७४४ वर पोहोचली.  जालन्यात सर्वाधिक १९ हजार ५७१ मजूर आहेत. बीड ८ हजार ९९८ व उस्मानाबाद ५ हजार ४४० मजूर आहेत. लातूरमध्ये सर्वात कमी ३१२ मजूर आहेत. औरंगाबाद ५ हजार ८४८, परभणी २ हजार २३७ व हिंगोली १ हजार ११२ मजूर कामावर आहेत.