दुष्काळाच्या तीव्र झळा सोसणाऱ्या जळगाव जिल्ह्य़ात समाधानकारक पाऊस असला तरी टंचाईची स्थिती अद्यापही गंभीर आहे. आजही ५६ गावांमध्ये ५४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जामनेर तालुक्यात २४ टक्के पाऊस झाला आहे. मृगातील पावसाने कांग व वाघूर नदीला पूर आला होता. त्यामुळे तालुक्यातील टंचाईच्या स्थितीत काहीशी सुधारणा झाली. सध्या २० गावांना २३ टँकरने पुरवठा करण्यात येत आहे. पावसाळ्यापूर्वी तालुक्यातील ७६ गावांमध्ये टँकर सुरू होते. जिल्ह्य़ात आतापर्यंत सरासरीच्या ३१ टक्के पाऊस झाला आहे. एरंडोल तालुक्यात सर्वाधिक, तर जामनेर व चाळीसगाव तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला आहे. चाळीसगाव तालुक्यातील दहा गावे तसेच भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड, अमळनेर, पारोळा आणि एरंडोल तालुक्यात अद्यापही टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. समाधानकारक पावसामुळे पेरण्या जवळपास आटोपल्या आहेत.

Story img Loader