उजनी धरणातील पाण्याची पातळी वरचेवर खालावत चालल्यामुळे त्याचा मोठा परिणाम सोलापूर शहराच्या पाणीपुरवठय़ावर होत आहे. गेल्या महिन्यापासून शहराला एक दिवसाआडऐवजी दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन अमलात आले तरी पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.
सोलापूर शहराच्या नऊ लाख ६० हजार लोकसंख्येचा विचार करता दररोज १३५ एमएलडी पाणीपुरवठय़ाची आवश्यकता आहे. पाणीपुरवठय़ासाठी शहराला उजनी जलाशय ते थेट सोलापूर पाईपलाईन योजना, विजापूर रस्त्यावरील टाकळीजवळील भीमा नदीवर औज बंधारा आणि तुळजापूर रस्त्यावरील ब्रिटिशकालीन हिप्परगा जलाशय या तीन उद्भवांवर विसंबून राहावे लागते. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत हिप्परगा जलाशयातील पाणीपुरवठा बंद झाला आहे, तर उजनी-सोलापूर थेट पाईपलाईन योजनेद्वारे केवळ ३० एमएलडी पाणी उचलले जात आहे. टाकळीच्या औज बंधाऱ्यावरून ४० एमएलडी पाण्याचा उपसा होतो. त्यामुळे दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे धोरण आखूनदेखील शहराला पाणीपुरवठा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
यातच उजनी धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालल्याने तेथील पाण्याचा उपसा करताना महापालिकेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. धरणात आजअखेर जेमतेम वजा ३७.५७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे अर्थातच जलाशयातील पाणी इनटेक चॅनेलद्वारे पंपगृहाजवळ आणणे आणि तेथून पुन्हा दुबार पंपिंग करून ५५० अश्वशक्तीच्या दोन पंपांद्वारे उजनी-सोलापूर थेट पाईपलाईनमध्ये टाकणे अशी तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्राप्त परिस्थितीचा विचार करून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालिका आयुक्त अजय सावरीकर यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा