तालुक्यात पाणी पुरवठा करणारे सर्व ४५ टँकर केवळ डिझेल मिळत नसल्याने गेल्या आठ दिवसांपासून बंद आहेत. दुष्काळाने होरपळलेल्या जनतेसमोर पाणीटंचाईचे संकट उभे राहिले असताना या परिस्थितीला केवळ तहसीलदार जबाबदार असल्याची तक्रार टँकरमालक करीत आहेत. टँकर तत्काळ सुरू करावेत; अन्यथा शिवसेनेतर्फे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
तालुक्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती असून सध्या ४५ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. दुष्काळामुळे नागरीक त्रस्त झाले असून पाण्याअभावी शेतातील खरीप व रब्बी असे दोन्ही हंगामाची पिके वाया गेली.  जनावरांच्या छावण्याही अनेक ठिकाणी बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. रोजगार हमीच्या कामांची मागणी असतानाही ते सुरू करण्याबाबत सरकारी पातळीवर उदासीनताच आहे.
असे असतानाच तालुक्यातील सर्व ४५ टँकर डिझेलअभावी बंद आहेत. डिझेलची बिले थकल्याने टँकर उभे आहेत. या बाबत तहसीलदारांनी कोणतीच कार्यवाही केलेली नाही. त्यांना परिस्थितीचे गांभीर्य नसून  ते कोणतेच काम जबाबदारीने करीत नाहीत, अशी तक्रार टँकरमालक सतत करीत असतात. दुष्काळामुळे त्यांची जबादारी वाढली आहे. टँकर बंद असल्याने लोकांचे मात्र चांगलेच हाल होत आहेत. पाण्याअभावी नागरिक भटकंती करीत आहेत. याला सर्वस्वी महसूल अधिकारी जबाबदार असल्याच्या तक्रारी आहेत. शिवाय टँकरमालकांचे भाडय़ाचे पैसेही थकले आहेत. या संदर्भात तातडीने उपाययोजना करून टँकर सुरू करावेत; अन्यथा शिवसेना आंदोलन करेल, असा इशारा तालुकाप्रमुख बळीराम यादव व दीपक शहाणे यांनी दिला आहे.

Story img Loader