उद्योजकांची तक्रार राज्य समितीपुढे नेणार
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ स्वत:च केलेल्या नियमांचा भ्ांग करत उद्योजकांना वाढीव, अन्यायकारक दराने पाणीपुरवठा करत आहे, अशा तक्रारी उद्योजकांनी आज केल्यानंतर हा विषय आता राज्य पातळीवरील उद्योग समितीपुढे व महामंडळाच्या उपस्थित केला जाणार आहे. जिल्हा उद्योगमित्र समितीची सभा आज सायंकाळी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिजच्या सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा उद्योग केंद्रातर्फे दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट लघूउद्योगांना पुरस्कार वितरीत करण्यात आले. श्री. शरद वैद्य (डीएटीसी, प्रथम, नगर), श्री. रामदास धावटे (ग्रीनशाईन बायोटेक, द्वितीय, पारनेर) व संगमनेर औद्योगिक वसाहत पुरस्कृत उत्तेजनार्थ पुरस्कार बिजल शेठ (आयकॉन मोल्डर्स, नगर) यांना देण्यात आले. यावेळी मोठय़ा संख्येने उद्योजक उपस्थित होते. महामंडळाने पाणीपुरवठा करताना पुरवठा खर्चाऐवढेच दर आकारण्याचा नियम केला असताना त्याचा भंग करत महामंडळ उद्योगांना १५ रुपये ५० पैसे दराने व उद्योगांच्या योजनेतून गावांना मात्र २ रुपये ७५ पैसे दराने पुरवठा करते. प्रमोद मोहोळे यांनी हा प्रश्न उपस्थित केला, त्यावर महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी रामदास खेडकर यांनी हा प्रश्न महामंडळापुढे, तसेच राज्य समितीचे सदस्य एम. आय. संकलेचा यांनी समितीत उपस्थित करण्याचे मान्य केले. नगर एमआयडीसीमध्ये ट्रक टर्मिनल उभारण्यासाठी हरजितसिंग वधवा यांनी इंटस्ट्रिअल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या वतीने प्रस्ताव सादर केला. सन फार्मा व सह्य़ाद्री चौकात सिग्नल व पोलीस नियुक्त करण्यात यावा, पोलीस गस्त वाढवावी, भूसंपादन लवकर व्हावे, प्रमुख चौकात माहिती व नकाशे दर्शवणारे फलक बसवावेत आदी मागण्या अशोक सोनवणे, अजित घैसास, प्रकाश गांधी आदींनी केल्या. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांना कार्यवाहीच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
पुरस्कार्थी श्री. वैद्य, धावटे यांनी मनोगत व्यक्त केले. उद्योग महाव्यवस्थापक बी. टी. यशवंते यांनी स्वागत केले. मराठा चेंबरच्या शाखेचे अध्यक्ष कमलेश शुक्ला यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार केला. जिल्हा उद्योग पुरस्कार घाईगडबडीत वितरीत करण्यात आल्याबद्दल अनंत देसाई व इतर उद्योजकांनी यशवंते यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.    
एमआयडीसीसाठी पुरेसा पाणीसाठा
मुळा धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्यात आल्याने नगर एमआयडीसीला भविष्यात पाणी कपातीस तोंड द्यावे लागेल का, असा प्रश्न उद्योजक वधवा यांनी उपस्थित केला. त्यावर नगर शहरास पिण्यासाठी व नगर एमआयडीसीस लागणाऱ्या पाण्यासाठी पुरेसा पुरवठा आहे, त्यात कोणतीही कपात केली जाणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
तक्रारींची झाली खातरजमा
जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यक्रमापूर्वी उद्योजकांसमवेत खासगी वाहनातून फेरफटका मारला. त्यावेळी अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था व ठिकठिकाणी फुटलेल्या जलवाहिन्या त्यांच्या निदर्शनास आल्या. त्याबद्दल त्यांनी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत त्वरित दुरुस्तीचे आदेश दिले. एमआयडीसीचे अधिकारी बेकायदा तोडीच्या तक्रारी नाकारत होते. परंतु फेरफटका मारताना जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास वृक्षतोड पडलीच. १४ झाडे तोडून लाकडे पळवणारा ट्रॅक्टरही पोलिसांच्या ताब्यात दिला होता. परंतु पोलिसांनीही कार्यवाही न करताच तो दुसऱ्या दिवशी सोडून दिल्याची तक्रार आहे.

Story img Loader