शहर पाणी पुरवठा योजनेतील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची साफसफाई होत नसल्याकडे उपमहापौर गीतांजली काळे यांनी आयुक्त विजय कुलकर्णी यांचे लक्ष वेधले आहे. टाक्यांच्या सुरक्षिततेकडेही मनपाचे पूर्ण दुर्लक्ष झाल्याचे निरिक्षण त्यांनी नोंदवले आहे.
आयुक्तांना त्यांनी याबाबत आज सविस्तर पत्रच दिले. शहरात साथीचे आजार सुरू आहेत. डेंगीसारख्या जीवघेण्या आजाराचे रुग्ण सापडत आहेत. मलेरिया, गॅस्ट्रो, कावीळ याप्रकारचे आजार अस्वच्छ पाण्यातून होत असतात. डेंगीच्या साथीत या आजाराची भर पडायची नसेल तर सर्व पाणी साठवण टाक्यांची शास्त्रोक्त पद्धतीने स्वच्छता व्हायला, हवी अशी सूचना उपमहापौरांनी केली आहे.
जमिनीखालील टाक्या व उंचावरील टाक्या अशा दोन प्रकारच्या टाक्या शहरात आहेत. त्यातूनच संपूर्ण शहराला व उपनगरांनाही पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा केला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून या टाक्यांची स्वच्छताच केली जात नाही. त्यामुळे टाक्यांमध्ये शेवाळ, सुक्ष्मजीवजंतू, कचरा मोठा प्रमाणावर साचलेला दिसतो आहे. सध्याच्या साथीच्या आजारांच्या पाश्र्वभूमीवर मनपाच्या सर्व टाक्या त्वरित शास्त्रशुद्ध पद्धतीने स्वच्छ करून घेणे गरजेचे आहे, असे उपमहापौरांनी म्हटले आहे.
त्याचबरोबर अनेक टाक्यांना संरक्षक भिंती नाहीत, त्यावर सुरक्षा रक्षकांची नियुक्ती आहे, मात्र ते कधीही उपस्थित नसतात. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून टाक्यांची काळजी घेणे गरजेचे असताना या महत्वाच्या बाबीकडे मनपाचे पूर्ण दुर्लक्ष झाले असल्याकडे उपमहापौरांनी आयुक्तांचा लक्ष वेधले आहे. पिंपरी-चिंचवड मनपाने आपल्या सर्व टाक्या दरवर्षी शास्त्रोक्त पद्धतीने स्वच्छ करून घेण्यास सुरूवात केली आहे. नागपूर महापालिकाही नियमीतपणे आपल्या सर्व टाक्या स्वच्छ करून घेत असते. नगर मनपासाठीही अशा एखाद्या एजन्सीची त्वरित नियुक्ती करावी, अशी मागणी उपमहापौरांनी केली आहे.    

Story img Loader