महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने ठाणे महापालिकेने पुरविण्यात येणाऱ्या पाण्याच्या दरांमध्ये प्रती लीटरमागे एक रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने महापालिकेवर वर्षांला सुमारे पाच कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून मिळणारे पाणी ठाणे महापालिका वागळे इस्टेट, विटावा, मुंब्रा, कौसा, दिवा-दातिवली, खिडकाळी अशा भागांमध्ये पुरवते. या भागात वाढीव पाणीपुरवठा करता यावा, यासाठी एकीकडे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे औद्योगिक विकास महामंडळाने पाण्याचे दर वाढविल्याने महापालिकेवरील आर्थिक भार वाढणार आहे. दरम्यान, एमआयडीसीने पाण्याचे दर वाढविले असले तरी त्याचा वाढीव बोजा येथील नागरिकांवर पडणार नाही, असा दावा महापालिकेने केला आहे.
ठाणे महापालिका हद्दीत वेगवेगळ्या प्राधिकरणांच्या माध्यमातून सुमारे ४६० दक्षलक्ष लीटर्स इतका पाण्याचा पुरवठा केला जातो. यापैकी मुंबई महापालिकेच्या पाणी योजनेतून ठाण्यास ६० तर स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशन कंपनीकडून १०० दक्षलक्ष लीटर्स पाणी पुरविले जाते. भातसा धरणावर ठाणे महापालिकेची स्वतची पाणी योजना असून या योजनेच्या माध्यमातून २०० दक्षलक्ष लीटर्स इतके पाणी महापालिकेस मिळते. वेगवेगळ्या स्रोतांमधून मिळणारे पाणी कमी पडत असल्याने महापालिकेने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरणातून १०० दक्षलक्ष लीटर्स पाण्याचा पुरवठा करून घेतला आहे. बारवी तसेच आंध्र धरण तसेच उल्हास नदीतून औद्योगिक विकास महामंडळ ठाणे महापालिकेस हे १०० दक्षलक्ष लीटर पाणी पुरवते. या पाण्यासाठी यापूर्वी महापालिकेस प्रती लीटरमागे आठ रुपयांचा दर आकारला जात असे. गेल्या पाच वर्षांपासून एमआयडीसीने हे दर कायम ठेवले होते. मात्र, नव्या आर्थिक वर्षांत यामध्ये एक रुपयांची वाढ करण्याचा निर्णय औद्योगिक विकास महामंडळाने घेतला असून यामुळे महापालिकेवर वर्षांला सुमारे पाच कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली. औद्योगिक विकास महामंडळाकडील पाणी खरेदीपोटी महापालिकेस दरवर्षी सुमारे २८ कोटी रुपयांचा खर्च येत असतो. यामध्ये सुमारे पाच कोटी रुपयांची वाढ होणार असली तरी हा भार रहिवाशांवर पडू दिला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा