शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या माजलगाव योजनेच्या जलवाहिनीला गळती लागल्याने नगरपालिकेने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. आधीच शहरवासीयांना ४ दिवसांआड पाणीपुरवठा होत होता. मात्र, दुरुस्तीच्या कामामुळे आता १५ दिवस ६ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
शहराला माजलगाव योजनेने दुष्काळात तारले. संपूर्ण उन्हाळय़ात या योजनेतून शहराला पाणीपुरवठा झाला. जवळपास ४५ किलोमीटर जलवाहिनी असल्याने होणारी गळती नगरपालिकेसाठी नेहमीची डोकेदुखी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून जलवाहिनीला ११ ठिकाणी गळती सुरू आहे. त्यातून दररोज मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जात आहे. यापूर्वी पालिकेने वारंवार दुरुस्ती करुनही गळती सुरूच असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. जलवाहिनीला गळती जमिनीतून सुरू आहे. त्यामुळे दूषित पाणीपुरवठा होऊन नागरिकांच्या आरोग्याला बाधा पोहोचू नये, या साठी पालिकेने दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. येत्या १४ फेब्रुवारीपर्यंत दुरुस्तीचे काम चालणार आहे. या दरम्यान पाईप कोरडा करुन टप्प्या-टप्प्याने दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती न. प.चे पाणीपुरवठा अभियंता एस. एस. वाघ यांनी दिली. दुरुस्ती काळात १५ दिवस शहराला ६ दिवसांआड पाणीपुरवठा होणार असल्याचे मुख्याधिकारी व्यंकटेश निलावाड यांनी सांगितले.

Story img Loader