रंग.. पाण्याची उधळण.. मद्य आणि सोबतच चना-चिवडय़ाचा आस्वाद घेत डीजे आणि ढोल ताशांच्या तालावर धूम मस्ती करीत आबालवृद्धांसह तरुणाईने शहरातील विविध भागात धूळवडीचा उत्सव जल्लोषात साजरा केला. होळी पेटत नाही तोच रविवार दुपारपासून विविध वस्त्यांमध्ये सर्वत्र चढू लागलेला धूळवडीचा रंग मंगळवार सकाळपर्यंत उतरायचे नाव घेत नव्हता.
विविध सामाजिक संस्था आणि महापालिकेने पाण्याचा वापर कमी करा, असे आवाहन केल्यानंतरही त्या आदेशाला झुगारून आबालवृद्धांनी ‘बुरा मत मानो’ म्हणून यथेच्च पाण्याचा वापर केला. अनेक वस्त्यांमध्ये पाणी टंचाई आहे, पण काही उच्चभ्रू वस्त्यांमध्ये यथेच्छ पाण्याचा वापर करून नासाडी केली जात होती. मात्र, त्याकडे सगळेच दुर्लक्ष करीत होते.
काळा, हिरवा, पिवळा, पांढरा, लाल, चंदेरी, सोनेरी अनेकविध रंग फासलेल्या चेहऱ्यांच्या आड न सामावणारा चेहरा बोंबाच्या मार्गाने बाहेर येत होता. अनेकांच्या चेहऱ्याचा आणि कपडय़ाचाही अवतार विदूषकाला शोभण्यासारखा झाला होता. जवळच्या माणसांना ओळखणे कठीण झाले होते. यंदाच्या धूळवडीला नव्या काळाचेही संदर्भ उलगडून आले होते. वर्षभरातील अनेक सण आता बसल्याजागेवरून शुभेच्छा पाठवून साजरे केले जात आहेत. एमएमएसचा मार्ग उपलब्ध असल्याने भेटी गाठी बंद झाल्या आहेत. धूळवडीचा सण मात्र त्याला अपवाद ठरला आहे. कुणी एसएमएसद्वारा शुभेच्छा पाठविल्या तरी घरी मित्राची धाड पडेलच याची भीती रंगापासून अलिप्त राहणाऱ्यांना दिवसभर लागूनच होती. शहरातील विविध भागात एकमेकांना रंग लावीत असताना पाण्याचा वर्षांव केला जात होता. रंगाच्या भीतीने बाहेर न पडणाऱ्या वस्त्या वस्त्यांमधील मित्रांना घरातून बाहेर काढून यथेच्छ रंगविण्याची परंपरा जपण्यात आली. तरुणांनी तर समाजातील सभ्य मंडळीचे आणि पर्यावरणाचे सर्व संकेत धुडकावून लावत बेधुंदपणे धूळवड साजरी केली. केवळ माणसांचे चेहरे नव्हे तर शहरातील सर्व रस्ते रंगानी माखले होते. घाण पाणी वाहून नेणारी गटारे, नाले रंगबेरंगी पाण्याने वाहत होते.
पोलिसांचा कडक बंदोबस्त असतानाही शहरातील काही भागात तरुणांच्या कसरतींनी धूळवडीला एक थरार प्राप्त झाला होता. सकाळी काहींनी हात सोडून तर काहींनी सुसाट गाडय़ा पळवल्या. यातील अनेक तरुणांवर पोलिसांनी कारवाईचा बगडा उगारून त्यांना दंड केला. शहरातील अनेक भागात डीजे व ढोल ताशांच्या तालावर नृत्य करीत होते. होळी पेटलेल्या ठिकाणी तरुणांनी केलेल्या नृत्याला तोड नव्हती. कोणी वस्तीमधून नवीन माणूस जात असेल तर त्याला अडवून रंग लावणे व त्याच्या नावाने बोंबा ठोकली जात होती. बुरा न मानो होली है असे म्हणत एकमेकांना रंग लावत धूळवड साजरी केली जात होती.
चौकाचोकात, चाळीमध्ये, अपार्टमेंट किंवा सोसाटय़ांमध्ये मोठय़ा जोमाने धूळवड साजरी करण्यात आली. धूळवडीच्या या उत्साहात पाण्याची टंचाई जाणवू नये म्हणून अनेक अपार्टमेंटमध्ये आधीच लोकांनी पाण्याचे टाके भरून ठेवले होते. शहरात धरमपेठ, लक्ष्मीनगर, गोकुळपेठ, प्रतापनगर, या भागात धूळवड खेळणाऱ्यांमध्ये परप्रातींय विद्यार्थी आणि नागरिकांची संख्या अधिक होती. हे विद्यार्थी एकमेकांच्या घरी किंवा वसतिगृहात जाऊन रंगाची उधळण करीत होते. युवक सकाळपासूनच दुचाकीवरून भरधाव फिरत होते. चौकाचौकांमध्ये उभे राहून एकमेकांना रंग लावत होते. शहरातील विविध भागातील अपार्टमेंटमध्ये सामूहिकपणे धूळवड साजरी करण्यात आली. सोबतच एकमेकांना रंग लावत रंगाची उधळण करीत होते.
काही ठिकाणी सामूहिक भोजनाचे आयोजन केले होते. धूळवडीच्या मस्तीत रमलेल्या तरुणांवर पोलिसांची नजर असली तरी अनेक युवक पोलीस नसलेल्या भागात सुसाट वेगाने गाडय़ा फिरविण्याचा आनंद घेत होते. शहरात इतवारी महाल सीताबर्डी या भागात अनेक युवकांनी ढोल ताशांच्या निनादात मिरवणूक काढली होती. रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या लोकांच्या अंगावर रंग उडवित होते. इतवारीमध्ये व्यापाऱ्यांनी एकमेकांना रंग लावून धूळवडीचा आनंद साजरा केला. अनेक वस्त्यांमध्ये महिलांनीसुद्धा एकमेंकाना रंग लावत धूळवड साजरी केली. धूळवडीला सर्वात जास्त मजा असते ती लहान मुलांची. लहान मुले धूम मस्ती करीत रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या लोकांच्या अंगावर पिचकारीने रंग उडवित होते.
रंगामुळे अनेकांच्या डोळ्याला इजा
धूळवड साजरी करताना आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन आणि यासंदर्भात जागृती करूनही जिल्ह्य़ातील विविध भागात रंगामुळे लोकांच्या डोळ्यांना इजा झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शिवाय विषबाधा आणि वेगवेगळ्या अपघातांचे १५० पेक्षा अधिक रुग्णांवर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. त्यातील काही रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. विविध घटनांमधील ४० रुग्ण दाखल आहेत. होळी आणि धूळवडीच्या दिवशी रंग खेळताना सावधिगिरी बाळगावी असे विविध सामाजिक संघटनासह वैद्यकीय विभागाने आवाहन केले असताना त्या आवाहनला न जुमानता अनेक शहरातील विविध भागात युवकांनी नको ते रंग उपयोगात आणल्यामुळे अनेकांना त्याचा त्रास झाला. मेडिकलमधील नेत्र विभागात ६ रुग्णांच्या डोळ्यांवर उपचार करण्यात आले. त्यातील काही रुग्णांच्या डोळ्यात रंग गेल्यामुळे जळजळ वाढली होती तर काहीच्या डोळ्यांना जखमी झाल्या होत्या. सर्व रुग्णांवर उपचार करून त्यांना सुटी देण्यात आल्याचे नेत्र विभागाचे प्रमुख डॉ. अशोक मदान यांनी सांगितले. शासकीय वैद्यकीय रुग्णांच्या आकस्मिक विभागात अपघाताचे आणि विषबाधेच्या रुग्णावर उपचार करण्यात आले. मद्य घेऊन गाडी चालवू नका असे आवाहन केल्यानंतर त्या आवाहनाला न जुमानता युवकांनी सुसाट वेगाने गाडय़ा चालविल्याने त्यातून अपघात झाले. शहरातील विविध भागात झालेल्या अपघातामधील १५ रुग्णांवर उपचार करण्यात आले.