* २४ तास पाणी पुरवठा होणारी उपनगरे सीबीडी, ऐरोली, घणसोली, सानपाडा, नेरुळ, जुईनगर, तुर्भे, वाशी सेक्टर-१७ तसेच कोपरखैरणेचा काही भाग.
* सकाळी सहा ते रात्री १० पर्यंत सलग पाणी पुरवठा
* सिडको वसाहतींमध्ये २४ तास पाणी पुरवठा देण्याचा प्रयत्न
* सुमारे नऊ लाख ५२ हजार लोकसंख्येसाठी २४ तास पाणी
* नासाडी रोखण्यासाठी विशेष पथके
राज्यातील प्रमुख शहरांमध्ये पाणीपुरवठय़ाचे गणित काहीसे अवघड बनत असताना नवी मुंबई महापालिकेने शहरातील सुमारे साडेनऊ लाख लोकसंख्येसाठी २४ तास पाणीपुरवठा करण्याचा प्रयोग जवळपास यशस्वी करत आणला असून वाशी आणि कोपरखैरणे या महत्त्वाच्या उपनगरांचा काही भाग वगळता इतर सर्व ऊपनगरांमध्ये १५ तासांहून अधिक काळ पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. सिडको वसाहतींमध्ये सकाळी लवकर उठून पाणी भरण्याची नागरिकांची कसरत यामुळे थांबणार आहे. पाण्याची नासाडी होऊ नये याकरिता रात्री दहानंतर बहुतांश भागात पाणीपुरवठा खंडीत केला जात आहे. मात्र केवळ खबरदारी म्हणून असे केले जात आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अरिवद िशदे यांनी वृत्तान्तला दिली.
मोरबे धरणातून नियमित होणाऱ्या पाणीपुरवठय़ामुळे हा टप्पा गाठणे शक्य होत असले, तरी यामुळे पाण्याच्या नासाडीचे प्रमाण वाढले आहे का, हे तपासण्यासाठी महापालिकेने विशेष पथकेही स्थापन केली आहेत. मुंबईनंतर स्वत:च्या मालकीचे धरण असलेली नवी मुंबई ही राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची महापालिका आहे. खालापूर तालुक्यातील मोरबे धरणात माथेरानच्या डोंगररांगांतून येणारे पावसाचे पाणी साठवले जाते. राज्यातील इतर भागांच्या तुलनेत माथेरान परिक्षेत्रात पावसाचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे दुष्काळी परिस्थीतीतही मोरबे धरणात पाणीसाठा चांगला असतो, असा आजवरचा अनुभव आहे. नवी मुंबईत २४ तास पाणीपुरवठय़ाचा प्रकल्प राबविण्याची संकल्पना पालकमंत्री गणेश नाईक यांनी तब्बल पाच वर्षांपूर्वी मांडली होती. या संकल्पेवर आधारित असे काम गेल्या काही वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. नवी मुंबईत ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी, तुर्भे, सानपाडा, नेरुळ, सीबीडी, दारावे, जुईनगर अशी दहा उपनगरे आहेत. या ठिकाणी सिडकोने टाकलेल्या जलवाहिन्या गंजून गेल्याने २४ तास पाणीपुरवठा प्रत्यक्षात आणणे शक्य नव्हते. त्यामुळे महापालिकेने सिडकोकालीन मुख्य जलवाहिन्या बदलण्याचे काम मध्यंतरी सुरू केले. हे काम आता अंतिम टप्पा गाठू लागले असून त्यामुळे वेगवेगळ्या ऊपनगरांमध्ये २४ तास पाणी पुरवणे शक्य होऊ लागले आहे.
नवी मुंबई महापालिकेमार्फत शहरी भागात सकाळी सहा ते आठ, तर सायंकाळी साडेसात ते नऊ यावेळेत पाणीपुरवठा केला जातो. शहरातील सुमारे ५२ हजार कुटुंबे ही सिडको वसाहतींमध्ये राहातात. त्यामुळे खासगी वसाहतीत पाण्याच्या टाक्यांमुळे २४ तास पाणीपुरवठा होत असला, तरी सिडको वसाहतींमध्ये मात्र पाण्याच्या वेळेची बंधने आहेत. हे बंधन दूर व्हावे यासाठी प्रयोगिक तत्त्वावर सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अरिवद िशदे यांनी वृत्तान्तशी बोलताना दिली. रात्री दहानंतरही पाणीपुरवठा करणे शक्य असले तरी यामुळे पाण्याचा अपव्यय होऊ नये, यासाठी दहानंतर पाणी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे िशदे यांनी स्पष्ट केले. शहरातील जवळपास ८५ टक्के भागात सलग पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून वाशी आणि कोपरखैरणे अशा दोनच उपनगरांमध्ये ही योजना अद्याप कार्यान्वित करण्यात आलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. येत्या आठवडाभरात वाशीतील सेक्टर एक ते आठ या भागांतही २४ तास पाणीपुरवठा करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा