सोलापूर महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या आदेशानुसार शहरात अवैध नळजोडणीच्या विरोधात हाती घेण्यात आलेल्या मोहिमेत आणखी बारा जणांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. यात एका उद्योजकाचाही समावेश आहे. या मोहिमेत गेल्या दोन दिवसांत ३९ मिळकतदारांविरुद्ध फौजदारी कारवाई झाली आहे.
अक्कलकोट रोड एमआयडीसीजवळ लक्ष्मीनारायण चित्रपटगृहासमोरील पाणी टाकीलगत खंडेलवाल कारखाना व श्रीनाथ इंडस्ट्रीज येथे महापालिकेच्या जलवाहिनीला अनधिकृपणे छेद पाडून पालिकेच्या पाण्याची चोरी केल्याप्रकरणी उद्योजक जगदीशप्रसाद खंडेलवाल यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात पालिका प्रशासनाच्या वतीने फिर्याद नोंदविण्यात आली. खंडेलवाल हे गेल्या एक वर्षांपासून महापालिकेच्या पाण्याची चोरी करीत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
तर विजापूर रस्त्यावरील सुशीलनगर परिसरात अकरा मिळकतदारांनी आपल्या घरी महापालिकेच्या नळांची अनधिकृत जोडणी करून सर्रासपणे पाण्याची चोरी केल्याचे आढळून आले. या प्रकरणी सागर साबळे, रेणुका देवकुळे, शरद कांबळे, धानम्मा मड्डे, रामू माने, अनसूया गुरुभट्टी, केरप्पा काळे, वजीर जमादार, नौशाद शिकलकर, इंदूबाई स्वामी व मनोहर गायकवाड यांच्याविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात पाणी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
अपघातात दोघांचा मृत्यू
माळशिरस तालुक्यातील सुळेवाडी शिवारात पिलीव-म्हसवड रस्त्यावर भरधाव एसटी बसची मोटारसाकलला धडक बसून घडलेल्या अपघातात राजेंद्र देवराव सूर्यवंशी (वय ४५, रा. गिरजणी, ता. माळशिरस) व बाळासाहेब रामचंद्र राऊत (वय ४८, रा. चौडेश्वरवाडी, ता. माळशिरस) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. हे दोघे जण मोटारसायकलवर बसून सायंकाळी प्रवास करीत असताना समोरून येणाऱ्या भरधाव एसटी बसने त्यांना ठोकरले. एसटी बस चालकाने अपघातानंतर पलायन केले असून त्याच्या विरुद्ध माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
सोलापुरात अवैध नळजोडणीद्वारे पाणीचोरी; आणखी १२ जणावर कारवाई
सोलापूर महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या आदेशानुसार शहरात अवैध नळजोडणीच्या विरोधात हाती घेण्यात आलेल्या मोहिमेत आणखी बारा जणांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात आली आहे.
First published on: 17-11-2013 at 01:50 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watertheft by illegal tapconection in solapur action on