सांगली महापालिकेच्या स्वीकृत आणि स्थायी समिती सदस्यांच्या निवडीमध्ये उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मदन पाटील यांच्या गटालाच झुकते माप मिळाले आहे. शुक्रवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या निवडीची घोषणा करण्यात आली. अवघ्या महापालिका क्षेत्राचे  लक्ष लागून राहिलेल्या स्वीकृत सदस्यपदाची संधी शेखर माने, गजानन मगदूम आणि आयुब पठाण यांना काँग्रेसने दिली आहे. गटनेते किशोर जामदार यांनी या निवडी वरिष्ठ नेत्यांनीच केल्या असल्याचे सांगत काँग्रेस एकसंघपणे कार्यरत राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
नव्या महापालिका सभागृहात स्वीकृत सदस्य आणि स्थायी समिती सदस्य निवडीसाठी महापौर  कांचन कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी आमसभा झाली. विषयपत्रिकेवर केवळ सदस्य निवडीचे दोन विषय होते. काँग्रेसच्या कोटय़ातून शेखर माने, गजानन मगदूम, आयुब पठाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोटय़ातून संजय बजाज तर स्वाभिमानी विकास आघाडीच्या कोटय़ातून संभाजी पवार यांचे पुत्र गौतम पवार यांच्या निवडी झाल्याचे जाहीर करण्यात आले.
तसेच यावेळी महापालिकेचा आíथक डोलारा सांभाळणा-या स्थायी समितीच्या १६ सदस्यांच्या निवडी महापौर कांबळे यांनी जाहीर केल्या. संख्याबळानुसार काँग्रेसचे ९, राष्ट्रवादीचे ६ आणि स्वाभिमानी विकास आघाडीचे  २ सदस्य स्थायी समितीत राहणार आहेत. यामध्ये वंदना कदम, किशोर लाटणे, अनारकली कुरणे, राजेश नाईक, संजय मेंढे, हसिना नायकवडी, विजय घाडगे, किशोर जामदार आणि सुरेश आवटी या काँग्रेसच्या ९ सदस्यांचा समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर मनुद्दीन बागवान, विष्णू माने, शुभांगी देवमाने, धीरज सूर्यवंशी  आणि सुनिल कलगुटगी तर स्वाभिमानी विकास आघाडीतील उमेश पाटील व बाळासाहेब गोंधळे यांचा समावेश स्थायी समितीत करण्यात आला आहे.
 पात्र उमेदवारांची यादी निर्धारित वेळेत देणे काँग्रेसला शक्य झाले नाही. त्यासाठी मुदतवाढ घ्यावी लागली. या संदर्भात सभेच्या प्रारंभीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनुद्दिन बागवान यांनी आक्षेप घेत प्रशासनाने या संदर्भात नेमकी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली. मात्र प्रशासनाकडून २६ ऑगस्टच्या बठकीत विधीवत पत्र गटनेत्यांना दिले होते. मुदतवाढ मागितल्यानंतर मुदतवाढ दिली गेली. यामध्ये गर काहीही झाले नाही असे सांगण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीमती शुभांगी देवमाने यांनी महापालिकेचे आरोग्य अधिकारी स्वच्छतेच्या सुचनांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करून त्यांना देण्यात आलेला भ्रमणध्वनी महापालिकेचा असताना सदस्यांच्या सुचनांना डावलण्याचा प्रयत्न होतो हा सदस्यांचा अपमान आहे असा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र याबाबत प्रभाग समिती अस्तित्वात आल्यानंतर सदस्यांच्या प्रश्नांची तड लवकरात लवकर लागेल असे सांगून पडदा टाकण्यात आला.
स्वीकृत सदस्यांच्या काँग्रेसच्या संख्याबळानुसार तीन जागा उपलब्ध होत्या. या तीन जागांसाठी काँग्रेस अंतर्गत असणा-या गटातटाकडून तब्बल ४८ जणांनी संधी मागितली होती. मात्र स्वीकृत सदस्यपदासाठी केवळ मदन पाटील गटाचाच विचार केला असल्याचे जाहीर झालेल्या नावावरून स्पष्ट होते. महापालिका निवडणुकीच्या कालावधीत काँग्रेस अंतर्गत असणारे सर्वगट तट एकत्र आल्याचे चित्र होते. काँग्रेसच्या ऐक्य एक्स्प्रेसमुळे महापालिका निवडणुकीत स्वबळावर सत्ता स्थापन्याची संधी प्राप्त झाली. पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या गटातूनही स्वीकृतसाठी संधी मागण्यात आली होती. तसेच निष्ठावंत काँग्रेस गटाकडूनही संधीची अपेक्षा होती. स्वीकृत पाठोपाठ स्थायी समितीमध्ये सुद्धा एकाच गटाला झुकते माप दिल्याचे दिसून आले.
स्वाभिमानी विकास आघाडीला स्वीकृतच्या एका जागेसाठी दोन अपक्ष नगरसेवकांनी पािठबा दिला होता. याबद्दल स्वाभिमानी विकास आघाडीकडून स्थायी समिती साठी उमेश पाटील यांची शिफारस करून परा फेडला असेच मानले जात आहे.
याबाबत गटनेते किशोर जामदार यांना विचारले असता त्यांनी सांगितले की पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सदस्य निवडीचा निर्णय घेतला आहे. सांगली-मिरज व कुपवाड असा भेदभाव न करता महापालिका एक असे मानून निर्णय घेतले आहेत. प्रभाग समित्या स्थापन झाल्यानंतर प्रत्येक समितीसाठी तीन नागरिक नियुक्त करण्यासाठी प्रशासकीय सोय उपलब्ध आहे. या तीन सदस्यांना नगरसेवकांइतकेच अधिकार असल्याने त्यावेळी अन्य कार्यकर्त्यांचा विचार केला जाण्याची शक्यता आहे. स्थायी समिती सदस्यांची निवड विभागीय आयुक्तांना कळविण्यात येईल त्यानंतर विभागीय आयुक्त स्थायी सभापती निवडीसाठी स्वतंत्रपणे बठक घेतील असेही जामदार यांनी सांगितले.