धर्माबाद तालुक्यातल्या बाभळी बंधाऱ्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आंध्रप्रदेशची याचिका फेटाळल्यानंतर धर्माबाद व परिसरात जल्लोष करण्यात आला. न्यायालयाच्या निकालामुळे धर्माबाद व परिसरातील तालुक्याचे हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
धर्माबाद तालुक्यात गोदावरी नदीवर बाभळी येथे २.७४ टीएमसी साठवण क्षमतेचा बाभळी बंधारा बांधण्यास तत्कालीन पालकमंत्री डॉ. माधव किन्हाळकर यांनी मुख्यमंत्री शरद पवार यांच्याकडे पाठपुरावा केला. पवार यांनी बंधाऱ्याला मान्यता दिली. त्यानंतर युतीचे सरकार आले व बंधाऱ्याचे काम रखडले. सन १९९५मध्ये मान्यता मिळालेल्या बंधाऱ्यास ४ वर्षांनंतर (१९९९) राज्यात आघाडीचे सरकार आल्यावर निधी मिळावा, या साठी पाठपुरावा झाला. त्यास २००४ मध्ये यश मिळाले. माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील व डॉ. माधव किन्हाळकर यांनी तत्कालीन पाटबंधारे मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्याकडे आग्रह धरल्यानंतर १९ ऑगस्ट २००४ रोजी बंधाऱ्याच्या कामास निधी मिळाला. त्याच दिवशी श्रीमती पाटील यांच्या हस्ते बंधाऱ्याच्या कामाचे भूमिपूजन झाले.
दरम्यान, बंधाऱ्याच्या कामास सुरुवात झाल्यानंतर आंध्रप्रदेशातल्या तेलगू देसम पक्षाने राजकीय पोळी भाजण्यासाठी या बांधकामाला विरोध केला. ७ मे २००५ रोजी तेलगू देसमचे प्रमुख चंद्राबाबू नायडू आपल्या लव्याजम्यासह तेथे पोहोचले व बांधकामाला विरोध केला. त्यानंतर केंद्रीय जलआयोगाकडे हा विषय गेला. दिल्लीत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र व आंध्रप्रदेशने आपापली बाजू मांडली. या बैठकीत महाराष्ट्राची बाजू सरस ठरली. परंतु तेलगू देसमने हा विषय सर्वोच्च न्यायालयात नेला. रास्ता रोको, रेल रोको, मोर्चा आदी मार्गानी धर्माबाद, तसेच परिसरातील जनतेने आंदोलने केली. २६ एप्रिल २००७ रोजी सर्वोच्च न्यायालयाने बांधकामाला हिरवा कंदिल दाखवला. ३२ कोटींचा हा प्रकल्प कालांतराने २०० कोटींवर पोहोचला. बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पाणी अडविण्यास मात्र सरकारला अडचण होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने आता या बंधाऱ्यावर पाणी अडविण्यात येणार आहे. त्यामुळे धर्माबाद व परिसरातील तालुक्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर बाभळी बंधारा कृती समितीचे अध्यक्ष नागोराव जाधव रोषणगावकर, डॉ. प्रा. बालाजी कोम्पलवार, गणेशराव करखेलीकर, दत्ताहरी चोळाखेकर, विश्वनाथ बन्नाळीकर, विनायक कुलकणी यांच्यासह सर्वच पक्षांतील नेत्यांनी जल्लोष साजरा केला. धर्माबाद तालुक्यातल्या ५९ गावांत नियमित पाणीपुरवठा होण्याचा मार्ग आता मोकळा झाला. सहा तालुक्यांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे. नांदेड तालुक्यातल्या आमदुऱ्यापर्यंत तब्बल ५८ कि. मी. परिसरात शेतीचा प्रश्न मिटणार आहे. धर्माबाद व परिसरात लोकांना फ्लोराईड युक्त पाणी प्यावे लागते. बंधाऱ्यातून पाणीपुरवठा झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटणार आहे. बंधारा बांधण्यापूर्वी शेकडो टीएमसी पाणी आंध्रातून वाहून समुद्रात जात होते. पण आता गोदावरी नदीतल्या या पाण्याचा जिल्ह्य़ातील जनतेला चांगला फायदा होणार आहे.

Story img Loader