उसाला प्रतिटनाला ३५०० रुपये हमीभाव मिळावा, या मागणीसाठी शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेने बुधवारी जिल्ह्याच्या विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले. या रास्ता रोको प्रकरणी पोलिसांनी २० आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आजचा रास्ता रोको करण्यात आला.
उसाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी कारखान्यांनी उसाला ३५०० रुपयांची उचल जाहीर करावी, सी. रंगराजन समितीच्या शिफारशी मान्य करून त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी करीत शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली वसगडे-नांद्रे रोडवर रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी रस्त्यावर टायर टाकून  पेटवण्याचा प्रयत्नही आंदोलकांनी केला. या रास्ता रोको करणाऱ्या २० आंदोलक शेतक-यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सरकारने तातडीने ऊसदराचा प्रश्न सोडवून ३५०० रुपये दर जाहीर करावा अन्यथा सरकारला एकही सण-उत्सव सुखाने खाऊ देणार नाही असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.
शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाघवाडी येथे रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे एक तास या महामार्गावरील वाहतूक रोखून धरण्यात आली होती. तसेच मिरज-म्हैसाळ मार्गावर उड्डाणपुलानजीक महाराष्ट्र-कर्नाटक मार्गावरील वाहतूक शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काही काळ रोखली होती. मिरज-पंढरपूर मार्गावर कवठेमहांकाळ येथेही शेतकरी संघटनेने रास्ता रोको आंदोलन केले.
ऊसदरावरून शेतकरी संघटना आणि कारखानदार यांच्यात निर्माण झालेल्या संघर्षांवरून बाका प्रसंग निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी सर्वच ठिकाणी बंदोबस्त वाढविला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा