विश्वधर्म स्वीकारणाऱ्या आणि वैश्विक चिंता वाहणाऱ्या या महाराष्ट्रात आज आपण संतांना आणि विचारवंतांनाही जातीधर्मात विभागत आहोत. त्यावेळी वाहून घेणाऱ्यांची संख्या अधिक होती. आता पाहून घेणारे वाढले आहेत. पुरोगामी चळवळी उदासीन झाल्यामुळे ही अवस्था झाली आहे, अशी भावना राजकीय अभ्यासक उल्हास पवार यांनी ‘बदलता महाराष्ट्र आणि आपण’ या विषयावर यशवंतराव दाते स्मृती व्याख्यानमालेचे रौप्य महोत्सवी पुष्प गुंफ ताना व्यक्त केली. स्थानिक सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते व समीक्षक डॉ. किशोर सानप यांची प्रमुख उपस्थिती होती.     
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षांत आयोजित या व्याख्यानात सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक महाराष्ट्रातील स्थित्यंतरे मांडतानाच उल्हास पवार यांनी फु ले-आंबेडकरी विचार आणि सत्यशोधकीय चळवळींचा आलेख सादर केला.
संस्थेतर्फे  दरवर्षी दिल्या जाणाऱ्या साहित्य पुरस्कारांचे यावेळी वितरण करण्यात आले. संध्या नरे-पवार (मुंबई), महेंद्र कदम (सोलापूर), रमेश चिल्हे (लातूर) यांनी पुरस्कार स्वीकारले.
६२ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सानप हे दाते संस्थेचे पदाधिकारी आहेत. त्यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. समाजातील समस्या सोडवण्याची जबाबदारी असणारे राज्यकर्ते त्यांची जबाबदारी विसरत असतील तर त्यांच्या विरोधात आंदोलन छेडू, असा इशारा डॉ. सानप यांनी दिला.
पुरस्कारप्राप्त लेखकांच्या मानपत्राचे वाचन प्रा. राजेंद्र मुंडे व रंजना दाते यांनी केले. संस्थाध्यक्ष दाते यांनी संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वाटचालीचा आढावा सादर केला.
डॉ. स्मिता वानखेडे यांनी संचालन केले. संजय इंगळे तिगावकर यांनी आभार मानले.