१६ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुमित्रा महाजन यांची निवड झाल्यानंतर नागपुरातील त्यांचे नातेवाईक, राष्ट्र सेविका समिती आणि चाहत्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला. सुमित्रा महाराज यांची जन्मभूमी चिपळून आणि कर्मभूमी इंदौर असली तरी नागपूरशी त्यांचे आगळे ऋणानुबंध आहेत. नागपुरात ज्यावेळी त्या येतात त्यावेळी त्या देवी अहल्यामंदिर आणि त्यांच्या मामेबहीण नीला नांदेडकर यांच्या घरी आवर्जून जातात. त्यांची १६ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याची बातमी कळताच आम्हाला तिचा अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्र सेविका समिती आणि नातेवाईकांनी व्यक्त केली.
महाजन यांच्या यशाबद्दल बोलताना राष्ट्रसेविका समितीच्या माजी संचालिका प्रमिलाताई मेढे म्हणाल्या, एखाद्या संघटनेत काम करीत असताना कुठल्या मोठय़ा पदावर गेले की मूळ संघटनेचा अनेकांना विसर पडतो. मात्र, सुमित्राच्याबाबतीत तसे नाही. समितीच्या सेविकापासून सुरू झालेला प्रवास लोकसभा अध्यक्षपदापर्यंत गेला असला तरी आजही ती आमच्यासाठी सेविका आहे. ती सुद्धा सेविका म्हणून स्वत: म्हणवून घेते त्यामुळे तिचा आम्हा सर्व सेविकांना अभिमान आहे. अहल्याबाई होळकर यांच्या विचारांपासून प्रेरित झालेल्या सुमित्राने समितीचे अनेक वर्षे काम केले आणि त्यानंतर राजकारणात प्रवेश केला तरी समितीला मात्र विसरली नाही. ज्यावेळी समितीचे कार्यक्रम होतात त्यावेळी ती सेविका म्हणून उपस्थित राहत असते. समितीचे अखिल भारतीय पातळीवर कुठलेही संमेलन असो की एखादी बैठक असो ती आवर्जून उपस्थित राहते. एक प्रशासक म्हणून तिने स्वतला सिद्ध केले आहे आणि लोकसभा अध्यक्ष म्हणून पुढे करेल.
वैचारिक बैठक झाल्यामुळे कुठलेही काम हाती घेताना ते विचारपूर्वक घेऊनच पूर्ण करते. स्वतच्या कर्तृत्वावर ती मोठी झाली आहे याचा आम्हाला अभिमान आहे. खापरीला राष्ट्रसेविका समितीचे अखिल भारतीय संमेलन असताना ती खासदार म्हणून नाही, समितीची सेविका म्हणून सहभागी झाली होती. शुल्क भरल्याशिवाय शिबिरात प्रवेश नव्हता त्यामुळे तिने प्रथम शुल्क भरले होते. सेविका म्हणून प्रवेशपत्र घेतले आणि त्यानंतर ती प्रत्येक कार्यक्रमात सहभागी झाली होती. अतिशय साधी राहणी आणि उत्कृष्ट वक्तृत्व म्हणून तिने अनेकांची परिसंवादातून मने जिंकली. १९६४ मध्ये अहल्याबाई होळकर यांच्यावर तिने नाटक लिहिले होते आणि ते विदर्भ साहित्य संघाच्या रंगमंचावर सादर केले होते. सुमित्रा महाजन आज लोकसभेच्या अध्यक्ष असल्या तरी त्या आज प्रथम समितीच्या सेविका म्हणून त्यांच्याकडे बघते. राष्ट्रहिताच्या दृष्टीने तिने निर्णय घ्यावे अशी समितीची अपेक्षा आणि ती घेईल असा विश्वास आहे, असेही प्रमिलताई म्हणाल्या.
सुमित्रा महाजन यांची बहीण नीला नांदेडकर म्हणाल्या, लोकसभा अध्यक्षपदी तिची निवड झाल्याची बातमी कळल्यावर आनंद झाला आहे. आमचे सर्व कुटुंब आनंदात भारावून गेले आहे. तिचे खरे नाव सुमन आहे. घरी आम्ही तिला सुमन म्हणतो. नागपूरला आली की आरामासाठी शंकरनगरातील माझ्या घरी येत असल्यामुळे आम्ही दोघी बहीण खूप गप्पा मारतो. खासदार झाल्यानंतर तिला वेळ कमी मिळत असे. मात्र, त्यातही ती कुटुंब आणि नातेवाईकांसाठी जास्तीत जास्त वेळ देते. खासदार, मंत्री आणि लोकसभा अध्यक्ष झाली तरी तिने स्वतला कधी मोठे मानले नाही. सगळ्यांमध्ये ती मिसळत असते. घरगुती कार्यक्रमात ती आवर्जून उपस्थित राहते. इंदौरला गेलो की आम्ही तिच्या घरी राहत होतो. शिस्तप्रिय आणि दिलेल्या कामात कुठलाही कामचुकारपणा नको असा तिचा आग्रह होता त्यामुळे तीच शिस्त तिने आपल्या परिवाराला लावली आहे. डॉ. अनिरुद्ध नांदेडकर म्हणाले, माझी मावशी असून एकदा ती घरी येत असताना अभ्यंकर नगरात ती पडली. तिच्या पायाला लागल्यामुळे तिने मला फोन केल्यावर तिला घेण्यासाठी गेलो. नागपुरात आली की पायी फिरत होती. नागपूरला भाजपचे संमेलन असताना ती घरी आली होती. त्यावेळी नरेंद्र मोदी यांच्याशी आमची ओळख करून दिली. मावशी लोकसभा अध्यक्ष झाली तरी आमच्यासाठी मावशी आहे आणि तिचा आम्हा परिवाराला अभिमान आहे.

Story img Loader