येणार येणार म्हणून नुसताच गाजावाजा होत असलेली मेट्रो आता येण्याची शक्यता नाही, हे सगळ्यांनी ठाम लक्षात घ्यावे. मूर्खाच्या भांडणात सामान्यांचा कसा बळी जातो, याचे हे आणखी एक उदाहरण आहे, असे समजावे आणि रात्रीच्या स्वप्नात मेट्रो येऊ नये, म्हणून नवससायास करावेत. पुण्यातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत असताना, त्याकडे लक्ष देण्याऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक खिळखिळी कशी होईल, यावरच लक्ष केंद्रित करणाऱ्या नगरसेवकांनी मेट्रोचे गाजर दाखवण्यापूर्वी बीआरटीचे गाजर दाखवून झाले होते. आपल्या घराच्या दारात वातानुकूलित बीआरटी बस येईल आणि मग आपण इंद्राच्या ऐरावतात बसल्याप्रमाणे त्यातून इच्छित स्थळी जाऊ, अशा स्वप्नात कितीतरी पुणेकर होते. कात्रज ते हडपसर या रस्त्यावरील मेट्रोच्या गाजराचे तोंडले झाल्याचे लक्षात येताच पुणेकरांनी सत्ताबदल घडवून आणला. त्यांना वाटले, की दुसरे जे स्वप्न दाखवताहेत, ते अधिक चांगले आहे. म्हणून त्यांनी कारभारी बदलला. नवा कारभारी ताज्या दमाने कारभार करू लागला. त्याने बीआरटीपेक्षा मेट्रोचे स्वप्न दाखवायचे ठरवले. मूर्ख पुणेकर या स्वप्नालाही भुलले. पाच वर्षे या मेट्रोच्या स्वप्नात दंग झाल्यावर कारभाऱ्याने येत्या पाच वर्षांत मेट्रो नक्की आणणार, असे जाहीर आश्वासन दिल्यानंतर अनेकदा स्वप्नभंग झाल्याने देवदास झालेल्या पुणेकरांनी पुन्हा एकदा निवडून दिले. त्यांना पक्की खात्री होती, की आता तरी मेट्रो नक्की येणार. दिल्लीच्या मेट्रोकडून पिंपरी ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी या मार्गावरील बीआरटीचे प्रकल्प तयार करून घेण्यात आले. त्यासाठी लागणाऱ्या पैशांची तरतूद करण्याच्या कामालाही वेग आला. आता स्वत:चे वाहन न नेता वेळेत पोहोचण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सामान्य पुणेकरापेक्षा, पुण्याच्या नगरसेवकांची स्वप्ने अधिक मोठी आणि विशाल असतात, हे लक्षात यायला वेळ लागला. पुण्यापेक्षा आपण काकणभरही कमी नाही, म्हणून पिंपरी-चिंचवडमधल्या नगरसेवकांनी शड्डू ठोकले. त्यांनी मेट्रो पिंपरीऐवजी निगडीपर्यंत नेण्याचे ठरवले, तर पुणेकर नगरसेवकांनी स्वारगेटऐवजी कात्रजपर्यंत मेट्रोचे हे स्वप्न लांबवण्याचे ठरवले. मेट्रोचा मार्ग वाढवायचा म्हणजे फक्त एका कागदावर तसा ठराव लिहून द्यायचा, एवढेच या नगरसेवकांना माहीत. रेल्वे मार्ग बांधण्यासाठी काय काय करावे लागते, याची त्यांना काय माहिती. असा ठराव पास झाल्यानंतर एका महाभागाने वनाझ ते रामवाडी हा मेट्रो मार्ग पुन्हा वळवून वारज्यापर्यंत नेण्याचा ठराव लिहून दिला. तोही संमत झाला. ठराव करायला काय जाते, मेट्रो थोडीच बांधायची असते? हा ठराव संमत झाल्यानंतर धनकवडी ते पद्मावती एवढय़ा मोठय़ा रस्त्यावर एक भला मोठा उड्डाणपूल बांधण्याचे काम वेगाने सुरू झाले. ठराव काय केला आणि काम कोणते सुरू केले, याचे कोणतेच भान नसल्यामुळे आता जर त्याच रस्त्यावर मेट्रो करायची ठरले, तर मग हा बांधलेला पूल पाडायचा की मेट्रो भुयारी करायची, याचा विचार करावा लागणार. हा सगळा गाढवपणा कमी म्हणून की काय, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगरपालिकांमध्ये कोणी किती निधी द्यायचा, यावरून खडाजंगी सुरू झाली. पिंपरीवाले म्हणाले, की आमच्या हद्दीतून जेवढी मेट्रो जाणार आहे, त्याच्या खर्चाच्या पाच टक्के रक्कम आम्ही देऊ. तर पुणेवाल्यांचे म्हणणे असे, की दोघांनी समान पाच टक्के रक्कम द्यावी. एकूण मेट्रो येईल अशी शक्यता नाही. तेव्हा पुणेकरांनी आपला मूर्खपणा मान्य करून टाकावा आणि ही मेट्रो आम्हाला नकोच, असा ठराव करून टाकावा हे बरे!  
  

Story img Loader