नंबर वनचा खेळ बॉलिवूडसाठी संपलेला नाही फक्त त्याचे स्वरूप बदलले आहे. आपण नंबर वनच्या शर्यतीत नाही, असे वरवर ते कितीही सांगत असले तरी आपल्यापुढचे स्पर्धक किती, याची त्यांची गणती सतत सुरू असते. त्यामुळे, पहिल्या तिघांमध्ये तीन खान, त्यानंतर मग कोण हे सध्या कोणत्या कलाकारांच्या चित्रपटांनी किती कमाई केली यावर त्यांची उतरती मांडणी सतत सुरू असते. पण, रणबीर कपूर, आयुषमान खुराणा अशा नविन कलाकारांनी आपली कुणाशीच स्पर्धा नाही अशी जाहीर बोंबाबोंब सुरू केली आहे.
‘बेवकूफि याँ’ या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच आयुषमानने आपली कुणाशीच स्पर्धा नाही कारण आपण नटही आहोत आणि उत्तम गायकही आहोत, असे म्हटले आहे. पण, सध्या इंडस्ट्रीत तो काही एकमेव गायक नट नाही. अली जफर या पाकिस्तानी अभिनेत्याचे उदाहरण घेता येईल, फरहान अख्तर तर गायन, अभिनय, निर्मिती, लेखन, दिग्दर्शन अशा सगळ्याच गोष्टींत सरस आहे. रणबीरशी आपली स्पर्धा नाही कारण तो आपल्यापेक्षा अनुभवाने मोठा आहे, तो आपल्यासाठी आदर्श आहे, असे आयुषमानचे म्हणणे आहे. तिकडे रणबीर कपूरही वरच्या फळीतल्यांशी आपली स्पर्धा नाही कारण ते दिग्गज आहेत आणि खालच्यांशी स्पर्धा नाही कारण मी त्यांच्यापेक्षा जास्त पुढे आहे, असे सांगतो आहे. सुशांत आणि सिध्दार्थ सध्या काहीही न बोलता चित्रपट पदरात पाडत सुटलेत. तर रणवीर आणि अर्जुन कपूर त्यांच्या हटके स्वभावामुळे जास्त लोकप्रिय आहेत.
सध्या प्रथितयश कलाकारांची म्हणजे २०० कोटी क्लबमधील वरच्या कलाकारांची पंगत सोडली तर खाली नव्या फळीत दररोज नव्या चेहऱ्यांचा भरणा होतो आहे. त्यातही प्रत्येकाला चित्रपट मिळत आहेत. हा नाही तर तो एकमेकाला पर्याय वाढले असल्याने साहजिकच वरच्या फळीपेक्षा खालच्या फळीतील कलाकारांना चित्रपट मिळवण्यासाठी चुरशीचा सामना करावा लागतो आहे हे खरे आहे. ह्रतिकसारख्या २०० कोटीची कमाई करणाऱ्या कलाकाराने ‘पानी’ हा शेखर कपूरचा चित्रपट सोडल्यावर त्याच्या जागी चक्क एक चित्रपट जुन्या असलेल्या सुशांत सिंग राजपूतची वर्णी लागली. त्यामुळे सध्या रणबीर, रणवीर, आयुषमान, अर्जुन कपूर, सुशांत सिंग राजपूत, सिध्दार्थ मल्होत्रा यांच्यात चांगलीच स्पर्धा आहे. पण, ही मंडळी इतकी हुश्शार की एकूणच आमची कोणाशीही स्पर्धा नाही. जुनेही आमचे आणि नवेही आमचे असे करत आपली खेळी खेळण्याचा फंडा या कलाकारांनी स्वीकारला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा