माणिकराव ठाकरे यांचा दावा
राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या लोकार्पण कार्यक्रमावर राष्ट्रवादी काँग्रेसचा बहिष्कार नसून अजित पवार, तसेच प्रफुल्ल पटेल आदी नेते उपस्थित राहणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. हा कार्यक्रम शासकीय असला तरी वचनपूर्ती केल्याबद्दल पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचे स्वागत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आले तर बिघडले कुठे, असा उलट सवाल त्यांनी केला.
कस्तुरचंद पार्कवर उद्या गुरुवारी दुपारी अडीच वाजता हा कार्यक्रम होणार असून त्यास विदर्भातील अडीच लाखाहून अधिक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित राहतील. हा कार्यक्रम शासकीय आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने केलेल्या वचनपूर्तीची माहिती देणे हा उद्देशही आहे. तळागळातल्या लोकांसाठी ही योजना सुरू केल्याबद्दल पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचे स्वागत केले जाणार आहे. असे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यावर बहिष्कार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे
या कार्यक्रमाला येणार नसले तरी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहे. व्यासपीठावर सर्वाना सन्मानाने बसविले जाईल, असे माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
खासदार मुकूल वासनिक, रोहयो मंत्री डॉ.नितीन राऊत, पालकमंत्री शिवाजीराव मोघे, आमदार दीनानाथ पडोळे व सेवक वाघाये, उल्हास पवार, कृष्णकुमार पांडे, अनीस अहमद, महापालिकेचे विरोधी पक्ष नेते विकास ठाकरे, दीपक काटोले, सुनील दुद्दलवार, भोला बैसवारे, रवींद्र पैगवार, शहर काँग्रेस अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता, प्रकाश लोणारे आदी पत्रकार परिषदेला
उपस्थित होते.
कार्यक्रम नक्की
किती वाजता?
प्रदेशाध्यक्षांच्या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे झाडून सारे नेते उपस्थित असले तरी खासदार विलास मुत्तेमवार आले नव्हते. त्यांच्या गटाचे दीनानाथ पडोळे, विकास ठाकरे, विशाल मुत्तेमवार आले होते. सतीश चतुर्वेदीही नव्हते. प्रदेशाध्यक्षांनी पडोळे व ठाकरे यांना आवाज देऊन व्यासपीठावर बोलावून घेतले. खासदारांच्या चिरंजीवांना मात्र त्यांनी बोलावण्याचे टाळले. खासदार विलास मुत्तेमवार आले नाहीत, याकडे लक्ष वेधले असता ‘ते उत्साही असून कार्यक्रमाच्या व्यवस्थेत आहेत’ अशी सारवासारव माणिकरावांनी केली. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या कार्यक्रमाच्या वेळेबाबत काँग्रेस नेत्यांमध्येच एकवाक्यता नसल्याचे उघड झाले. माणिकरावांनी हा कार्यक्रम अडीच वाजता असल्याचे सांगितले. पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी चार वाजता असल्याचे सांगितले होते. खासदार विलास मुत्तेमवार यांनी साडेतीन वाजता हा कार्यक्रम असल्याचे सांगितले.