अन्न सुरक्षा विधेयक विरोधकांमुळे लटकले आहे. ते काँग्रेस मंजूर करून घेईल, असे काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी सांगितले. दुष्काळग्रस्त भागातील चारा छावण्या, रोजगार हमीची कामे पाहिल्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. या वेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचीही स्तुती केली. या दौऱ्यात राहुल गांधी यांनी मुले व युवकांशी संवाद साधला. शेवता गावात शेतकऱ्यांशी संवाद साधताना अन्न सुरक्षा विधेयक किती महत्त्वाचे आहे, हे राहुल गांधी यांनी समजावून सांगितले.
हे विधेयक महत्त्वाचे असून विरोधकांनी ते अडवून ठेवले आहे. विरोधी पक्ष निवडता येत नाही, असा टोमणाही त्यांनी मारला. पत्रकारांशी बोलताना अन्न सुरक्षा विधेयकावरही ते आवर्जून बोलले. शेवता गावी रूपाली काळे या इयत्ता पाचवीतील मुलीला ‘तू कोण होणार’, असा प्रश्न विचारला. तिनेही मोठय़ा धिटाईने सांगितले, ‘मी डॉक्टर होणार.’ सतीश ठवळे या मुलाने सांगितले, ‘मी मास्तर होणार.’ आपल्या दौऱ्यात शेतक ऱ्यांसह युवक व मुलांशी त्यांनी आवर्जून संवाद साधला.
याच गावात शेतकऱ्यांशी बोलताना बाळासाहेब तुपे हे कार्यकर्ते उठले. त्यांनी त्यांच्या भागातील तक्रारी राहुल गांधींसमोर मांडल्या. त्यांच्या गळ्यात भगवा पट्टा होता. तावातावाने ते सांगत होते, पेरणीच्या वेळी मदत करा. किमान कर्ज द्या. त्यांच्या प्रश्नावर राहुल गांधी उत्तरले, ‘आप तो शिवसैनिक दिखते हो।’  त्यावर गावातील विकासाचे प्रश्न मांडत असल्याचे त्या कार्यकर्त्यांने सांगितले. त्यावर ‘आमच्या पक्षात या, तुमचे प्रश्न सोडवू’, अशी टिपणी राहुल गांधी यांनी केली.

Story img Loader