बेमुदत उपोषणाच्या पहिल्या टप्प्याची सांगता
जिल्हाधिकारी बदली प्रकरणात झालेला जनाक्रोश मुख्यमंत्र्यांनी ऐकावा व बदली रद्द करावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १० जुलैला बेमुदत उपोषणाला बसलेल्या युवक काँग्रेसच्या तुमसर विधानसभा अध्यक्ष सुलभा हटवार यांनी आंदोलनाच्या पहिल्या टप्प्याची सांगता केली. मात्र, दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ शासन काय निर्णय घेते यावर अवलंबून राहील, असे त्या म्हमाल्या. यानंतर त्यांना पोलिसांनी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले.
तत्पूर्वी, पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, उपोषणादरम्यान राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सुयोग्य अधिकारी देतो, असे आश्वासन दिले; परंतु बदलीबद्दल मात्र मौन बाळगले. मागील नागपूर अधिवेशनात युवक काँग्रेस कार्यकर्त्यांचे उद्बोधन करताना स्वत: मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी युवकांनो आमच्या चुका लक्षात आणून द्या, असे म्हटले होते. आम्ही त्याप्रमाणे केले. तसेच राहुल गांधी यांनीही सामान्य जनतेवरील अन्यायाविरोधात मोठय़ांची पर्वा न करता चिडून उठायचे, असे आवाहन केले होते. या मोठय़ांच्या मार्गदर्शनाला अनुसरूनच युवक काँग्रेस व एनएसयुआयने माझ्या नेतृत्वाखाली उपोषणाचा मार्ग स्वीकारला. मी माझे आंदोलन स्थगित करून पहिल्या टप्प्याची सांगता करीत आहे. दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ शासन काय निर्णय घेते यावर अवलंबून राहील.
गांधीवादी पद्धतीने आम्ही युवक पुढील आंदोलन अधिक तीव्रतेने करू. राहुल गांधी यांच्या ‘सामान्य जनतेसोबत’ या वक्तव्याशी मी प्रामाणिक आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी आमच्या आंदोलनाला उघड पाठिंबा दिला नाही, याचा खेद वाटत नाही.
प्रारंभी २-३ दिवस जिल्हाधिकाऱ्यांची बदली रद्द व्हावी, याकरिता मोठय़ा जोमाने आंदोलन चालविणाऱ्यांचे अभिनंदन करते. त्याचप्रमाणे आमच्या ‘एकला चलो रे’ आंदोलनाला भरघोस प्रसिद्धी दिल्याबद्दल सर्व पत्रकारांचे आभार मानते.
आंदोलनात सिंहाचा वाटा उचलणारे युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्यारेलाल वाघमारे, सौरभ बडवाईक, प्रमोद पटले, छोटुलाल मिरासे, भूषण टेंभुर्णे, संजय साकुरे, तसेच एनएसयुआयची जिल्हाध्यक्ष मधुश्री गायधने, अर्चना रामटेके, मुकुंद साखरकर, सचिन कुंभरे, सोनाली पाटील, सीमांत येरपुडे, प्रवीण भोयर, उषा पाटील, प्रवीण भगत, भूपेंद्र मिश्रा, अतुल सेलोकर, सागर भुरे, उज्ज्वल मेहर, अभिजित तुमसरे यांचा त्यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. आपल्याला डॉ. नितीन तुरसकर व धनंजय मुलकलवार यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या वेळी गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Story img Loader