गेल्या १२ वर्षांपासून राज्यातील सत्तेतील मंडळी बेईमान, बदमाश झाली असून ते चोरासारखे वागत आहेत. त्यांना आगामी निवडणुकीत धडा शिकवू व त्यांची मोगलाई संपवू, असा इशारा भाजपचे नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी दिला.
भाजपच्या वतीने लातूर तालुक्यातील मुरूड येथे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार टी. पी. कांबळे होते. व्यासपीठावर डॉ. गोपाळराव पाटील, आमदार सुधाकर भालेराव, गोविंद केंद्रे, रमेशअप्पा कराड, गणेश हाके, सुरजित ठाकूर, हणमंत नागटिळक आदी उपस्थित होते. मुंडे म्हणाले, की संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळत आहे. भुकेल्या, तहानलेल्या जनतेचे हाल पाहवत नाहीत. संवेदनहीन व नाकर्त्यां सरकारला सत्तेतून खाली खेचणे हे आपले पहिले उद्दिष्ट आहे. दुष्काळामुळे धरणात, नद्यात, तलावात, विहिरीत कोठेच पाणी नाही व सरकारमध्ये नाहीच नाही. सत्तेतील मंडळींना दुष्काळाशी सामना करताना केवळ पश्चिम महाराष्ट्रच का दिसतो? असा सवाल करून मुंडे म्हणाले, की एकटय़ा सोलापूरसाठी ६८० कोटींची तरतूद करण्यात आली व संपूर्ण मराठवाडय़ासाठी केवळ १० कोटीच दिले जातात. मराठवाडय़ातील जनता शांत आहे. ती गुलाम नाही हे सत्तेतील मंडळींनी लक्षात ठेवावे. मुंगीही अन्यायाचा प्रतिकार करते तेथे आम्ही माणसे आहोत हे विसरू नका, या शब्दांत त्यांनी इशारा दिला.
 वाजपेयी सरकारने दुष्काळावर मात करण्यासाठी नद्याजोड प्रकल्प हाती घेतला. नंतरच्या काँग्रेस सरकारने तो बासनात गुंडाळून ठेवला. महाराष्ट्रात सत्ता आल्यास राज्यातील संपूर्ण नद्या जोडण्याचा प्रकल्प आपण हाती घेऊ, असे ते म्हणाले.
मराठवाडय़ावर दुष्काळाचे प्रचंड संकट आले आहे. सुमारे २० लाख लोकांनी शेजारच्या कर्नाटक, आंध्र व गुजरात प्रांतात स्थलांतर केले आहे. सत्ताधारी मंडळी रेल्वेने पाणी देण्याच्या बाता करत आहेत. मात्र, पाणी कुठून आणणार? हे सांगत नाहीत. दुष्काळासाठी स्वतंत्र तरतूद केली नाही. वीजबिल, कर्ज, विद्यार्थ्यांचे शुल्क आदी निर्णय झाले नाहीत. चाऱ्याच्या छावण्या उभारण्याऐवजी शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाचे पैसे भरा, अशी सूचनाही त्यांनी केली. राज्यातील सर्व दुष्काळी तालुक्यांत स्वत: जाऊन जनतेशी संवाद साधणार असल्याचे ते म्हणाले.
विलासरावांच्या निधनानंतर लातूर पोरके झाले. लातूर ग्रामीणचे आमदार स्वत:तच मश्गूल आहेत. मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सामान्य माणसासाठी आपण रस्त्यावरील संघर्ष करणार असल्याचे रमेश कराड यांनी सांगितले. भाजप तालुकाध्यक्ष हणमंत नागटिळक यांनी प्रास्ताविक केले. आमदार सुधाकर भालेराव, डॉ. गोपाळराव पाटील, दिलीप देशमुख, टी. पी. कांबळे यांची भाषणे झाली. संपूर्ण ताकद लावून भाजपने आयोजन केल्यामुळे मेळाव्यास मोठी गर्दी होती. मुरूड शहरात स्वागत कमानी व भाजपच्या झेंडय़ाचेच दृश्य दिसत होते.
‘लातूरकरांना आधार देईन’
विलासराव देशमुख आपले जिव्हाळय़ाचे मित्र होते. त्यांच्या निधनामुळे लातूरकरांना पोरकेपणाची भावना निर्माण होणे स्वाभाविक आहे. मात्र, आपण बीडप्रमाणेच लातूरकडेही लक्ष देणार असून लातूरकरांनी आपला आधार संपला असे वाटून घेऊ नये, असे आवाहनही मुंडे यांनी केले.

Story img Loader