सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी करताना दरवर्षी गुंतवणूक करून कायमस्वरूपी रचना उभारण्याचा विचार करून नाशिक धार्मिक पर्यटन केंद्र होईल यासाठी प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केले. सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त तपोवन येथे उभारण्यात येणाऱ्या साधुग्राम आणि विविध विकास कामांचे भूमिपूजन शुक्रवारी तावडे यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांनी धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून शहरवासीयांच्या उत्पन्नात भर पडणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमास महापौर अॅड. यतीन वाघ, आ. गिरीश महाजन, खा. हरिश्चंद्र चव्हाण, भक्तिदास महाराज, महामंडलेश्वर संविदानंद सरस्वती, कृष्णदास महाराज, रामनारायणदास महाराज आदी उपस्थित होते. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी केंद्र सरकारकडून भरघोस निधी आणण्याची जबाबदारी आपण उचलली आहे. या संदर्भात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी चर्चा झाली असल्याचे तावडे यांनी सांगितले. नाशिक येथे दर बारा वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी एक कायमस्वरूपी रचना उभारण्याचा विचार झाला पाहिजे, असे मत मांडले. कुंभमेळ्यासाठी १२ वर्षांनी निधीची तरतूद करण्याऐवजी दरवर्षी निधीची तरतूद करण्यात यावी, जेणेकरून कायमस्वरूपी रचना उभी राहू शकेल. राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर ही व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा