विदर्भाला नाटय़ परंपरेचा इतिहास असून अनेक कलावंत या भूमीने रंगभूमीला दिले आहेत. त्यामुळे या भूमीत अखिल भारतीय नाटय़ संमेलन व्हावे यासाठी प्रयत्न करणार असून तसा ठराव नियामक मंडळाच्या बैठकीत मांडणार असल्याचे आश्वासन नाटय़ परिषद नियामक मंडळाचे सदस्य आणि राज्यमंत्री उदय सामंत यांनी कलावंताना दिले.
अखिल भारतीय नाटय़ परिषदेच्या नागपूर शाखेतर्फे उदय सामंत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व कालंवातानी नागपुरात नाटय़ संमेलन होण्यासाठी सामंत यांच्याकडे आग्रह धरला. यावेळी सामंत म्हणाले, नागपूरात ८४-८५ नंतर नाटय़ संमेलन झाले नाही. नागपुरात अनेक चांगले कलावंत असून त्यातील काही मुंबईत स्थायिक झाले आहे. नागपुरात नाटय़ संमेलन व्हावे यासाठी मी सुरुवातीपासून आग्रही आहे. नागपूरशिवाय पंढरपूर व सातारा या ठिकाणची निमंत्रणे आली असली तरी नागपूरला प्रथम प्राधान्य देण्यात येईल, असे आश्वासन सामंत यांनी दिले. सांस्कृतिक क्षेत्रात राजकारण आणू नये असा सल्ला देत सामंत म्हणाले, वाद सगळीकडे असतात पण ते वाद आपसात मिटवले गेले पाहिजे. नागपूरच्या नाटय़ शाखेत अनेक वाद असल्याच्या तक्रारी आहेत मात्र सर्वानी आपसातील मतभेद विसरून एकत्र यावे आणि संमेलनाच्या तयारीला लागावे, असेही सामंत म्हणाले.
कमी पैशात दर्जेदार नाटय़ संमेलन होऊ शकते हे रत्नागिरी संमेलनाच्यावेऴी दाखवून दिले. त्यामुळे पैशाची चिंता करू नये. नाटय़ परिषदेचा विकास करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने अनुदानासाठी ५ कोटीची तरतूद केली होती. मात्र, परिषदेने ३३ कोटी ७५ लाख रुपयाचा प्रस्ताव पाठविला आणि ते त्यांना मिळाले आहे. परिषदेकडे अजून १ कोटी २५ लाख रुपयाची मागणी करण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
 मुंबईत राहून नाटय़ परिषदेची शाखा चालविता येत नाही. नाटय़ परिषद ही घरोघरी पोहचली पाहिजे त्यासाठी कलावंतांनी प्रयत्न करावा, असे सामंत म्हणाले.यावेळी वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी यांच्या हस्ते उदय सामंत यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नागपूर शाखेचे अध्यक्ष प्रमोद भुसारी, कार्याध्यक्ष प्रफुल फरकासे, कार्यवाह किशोर आयलवार, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अजय पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अभय अंजीकर यांनी केले.