एखाद्या घरातल्या लग्नाळू तरुणांनी लग्न केल्यास त्यांना लगेचच मृत्यू ओढवेल, असं भविष्य कोणी वर्तवल्यास त्यांनी करायचं काय? लग्नाविनाच राहायचं? की भविष्याला ‘दे धक्का’ देत ‘जो होगा सो देखा जाएगा’ म्हणत लग्नाच्या बेडीत अडकायचं? तेही भविष्यवाणीनुसार थोरल्या भावाचा लग्नादिवशीच मृत्यू झालेला असताना? आणि साक्षात् सख्ख्या मामानंच हे भविष्य वर्तवलेलं असताना? कितीही बुद्धिवादी माणूस असला तरी त्याला आतून कुठंतरी टरकायला होणारच. परंतु म्हणून काय लग्नच करायचं नाही? मग आयुष्याला अर्थ तरी काय?
तिघा भावांना हा गहन प्रश्न पडलेला. त्यांची लग्नाविना घुसमट चाललेली. त्यांच्यापैकी दयानंद अखेरीस बंड करून आपल्याला आवडलेल्या मुलीशी पळून जाऊन लग्न करतो. त्याचा मृत्युयोग अटळ असल्याने त्याला ही दुर्बुद्धी सुचली, असं मामांचं त्यावर म्हणणं. त्यामुळे दयानंदच्या भवितव्याच्या चिंतेनं दादासाहेब व घन:श्याम हबकलेत. परंतु त्याच्या बाबतीत मामांची भविष्यवाणी खोटी ठरली तर आपलाही मार्ग प्रशस्त होईल, ही आशाही त्यांच्या मनात कुठंतरी धुगधुगी धरून असते. परंतु मामा आपल्या ज्योतिषावर ठाम! त्या दोघांना ते सावधानतेचा इशारा देतात.. ‘तुम्ही तरी निदान या मोहात सापडू नका!’
तशात दादासाहेब आमदारकीच्या निवडणुकीला उभा. पक्षश्रेष्ठींनी त्याला मदतनीस म्हणून नम्रता नावाच्या तरुणीस पाठवलेलं. मामानं एकीकडे ‘स्त्रीसहवास टाळा’ म्हणून धोशा लावलेला; त्यात ही नस्ती ब्याद गळ्यात येऊन पडलेली. त्यामुळे दादासाहेबांची भलतीच त्रेधातिरपिट उडते. तिकडे घन:श्यामचा वांधा असा की, तो अॅड् वर्ल्डमध्ये असल्यानं त्याचा सुंदर तरुण मॉडेलशी रोज संबंध येणं अपरिहार्यच. एका जाहिरातीच्या निमित्तानं रिबेका त्याच्या ऑफिस कम् घरी येते आणि त्याला आपल्या जाळ्यातही ओढू पाहते. नम्रता आणि रिबेकाच्या जवळिकीतून सुटका करून घेण्यासाठी दोघंही धडपडतात. पण व्यर्थ! शेवटी रिबेकाच्या ओढीनं दादासाहेबाला मृत्यूची तमा उरत नाही आणि तो तिच्या प्रेमपाशात अडकतो. तर घन:श्याम नम्रताच्या!
एवढय़ात हनिमूनला गेलेल्या दयानंदच्या बसला अपघात झाल्याची खबर येते आणि मामांची भविष्यवाणी खरी ठरते. दोघांची पाचावर धारण बसते.
पुढं काय? मृत्यू की लग्न? रिबेका आणि नम्रता त्यांना ‘लग्नाशिवाय प्रेम करूयात’चा पर्याय सुचवतात. पण स्त्रीसहवासाची पुढची पायरी लग्नात परिणत होण्याखेरीज दुसरं काय होऊ शकतं? हे जाणून ते आपापल्या प्रेयसींना दूर करू बघतात. पण..
आनंद म्हसवेकरलिखित आणि हेमंत भालेकर दिग्दर्शित ‘आम्ही लग्नाशिवाय’चं हे कथानक गमतीशीर विनोदी नाटकास भरपूर मालमसाला पुरवणारं असलं तरी नवं खचितच नाही. त्यातल्या साऱ्या खाचखळग्यांचा अंदाज प्रेक्षकांना आधीच येत असल्यानं मांडणी व सादरीकरणातच काय तो ताजेपणा आणला तरच ते प्रेक्षकाला धरून ठेवणार. याबाबतीतही फारसं काही हाती लागत नाही असं खेदानं म्हणावं लागतं. यातला दयानंदचा वेषांतराचा प्रवेश तर मराठी रंगभूमीवर चावून चोथा झालेलाच आहे. म्हसवेकरांसारख्या लेखकानं पुन्हा त्याचीच री ओढावी याला काय म्हणावं? शिवाय त्यांची ज्यावर हुकूमत असल्याचं म्हटलं जातं ती चमकदार संवादांची भट्टीही इथे नीट जमलेली नाही. नाटकाची रचनाही विसविशीत. मधेच त्यांना दादासाहेब निवडणुकीला उभा असल्याचा जणू विसरच पडलाय. काही काळ नाटक प्रेमप्रकरणांतच गुंतून पडतं. या काळात मामाही ‘लापता’ होतात. एकुणात संहितेत असा आनंदी आनंद असताना दिग्दर्शक तरी करून करून वेगळं ते काय करणार? कलावंतांकडून चोख कामं करवून घेणं, आणि शक्य असेल तिथं विनोदाच्या जागा काढणं.. बस्स. ते दिग्दर्शक हेमंत भालेकर यांनी इमानेइतबारे केलेलं आहे. कलावंतांनीही आपल्या परीनं नाटकात जान ओतण्याचा कसून प्रयत्न केला आहे. पण आडातच नाही, ते पोहऱ्यात कुठून येणार?
संतोष मयेकर या कसलेल्या नटानं ज्योतिषी मामा फर्मास रंगवला आहे. त्यांच्या आगळ्या गेटअप्मुळे आणखीनच गंमत आली आहे. पण त्यांच्यातल्या अस्सल विनोदी नटाला यात म्हणावा तितका वावच नाहीए. फ्रान्सिस ऑगस्टिन यांनी रेम्या डोक्याचा, भित्रा, पापभिरू नेता कम् कार्यकर्ता दादासाहेब समजून-उमजून उभा केला आहे. त्यांचं मंदबुद्धित्व, एकीकडे स्त्रीसहवासाची ओढ आणि दुसरीकडे मृत्यूच्या भयाची टांगती तलवार यांत होणारी कुतरओढ त्यांनी नेमकेपणी व्यक्त केली आहे.  चंट रिबेकाचं सोज्वळ रिबेकात होणारं रूपांतर वर्षां कांबळींना विश्वासार्हतेनं दाखवता आलेलं नाही. परिणामी रिबेकानं दादासाहेबात ‘तशा’ अर्थानं रस घेणं पचनी पडायला जड जातं. नम्रता झालेल्या श्वेता घरत यांची अभिनयाची नेमकी शैली निश्चित न केल्यानं त्या गोंधळलेल्या वाटतात. अतिशयोक्तीचं विनोदास्त्र त्यांना पेललेलं नाही. अर्थात नाटकाच्या हाताळणीशीही ते फटकून होतं. राहुल गोरेंच्या घन:श्यामला भूमीच (base) नव्हती. त्यामुळे ते आपल्या भूमिकेत कधी शिरलेच नाहीत. त्यांचं काम ‘हौशी’ होतं. प्रफुल्ल घाग यांचा जड जिभेचा सेक्रेटरी चोख. नाटकात दयानंद तसाही उपराच होता. त्यामुळे महेश देव यांच्या कामातही ते डोकावणं स्वाभाविकच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा