भारतीय धान्य महामंडळाच्या नागपूर कार्यालयाची किमया
 ज्यांच्या घरी वर्षभराचे धान्य साठवून ठेवले जाते, त्यांना हे काम जिकिरीचे असते याची कल्पना आहे. धान्य कडकडीत उन्हात वाळवायचे, ते कोठय़ांमध्ये साठवून ठेवायचे, त्यात औषधी गोळ्या किंवा कडुनिंबाचा पाला मिसळायचा आणि इतके करूनही ते वर्षभर खराब तर होत नाही ना याकडे अधूनमधून लक्ष ठेवायचे. तरीही धान्य कधीतरी खराब होतेच, त्याची वेगळी चिंता. इतके निगुतीने साठवलेले धान्य खराब होण्याची भीती राहात असेल, तर धान्याची पोती उघडय़ावर ठेवल्यास काय होईल..?
उघडय़ावर ठेवलेले धान्य पावसामुळे हमखास खराब होणार, किंवा उंदीर आणि घुशी त्याचा फडशा पाडणार, हेच याचे उत्तर आहे. पण धान्याची साडेचार लाख पोती तब्बल तीन वर्षे गोदामाबाहेर राहिली आणि तरीही त्यातील धान्याचे काहीही नुकसान झाले नाही, अशी किमया भारतीय धान्य महामंडळाच्या (एफसीआय) नागपूर जिल्हा कार्यालयाने करून दाखवली आहे. १ जानेवारी २०१० ते ३० डिसेंबर २०१२ या कालावधीत गव्हाची ४ लाख ३७ हजार ९२ पोती आणि तांदळाची २ हजार ५०४ पोती एफसीआयच्या गोदामाबाहेर ठेवण्यात आली, परंतु या कालावधीत धान्याचे कुठलेही नुकसान झाले नाही, असे या कार्यालयाने माहितीच्या अधिकाराखालील विचारणेच्या उत्तरात सांगितले आहे. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी देशभरात लाखो टन धान्य वाया जात असल्याबद्दल यापूर्वीच चिंता व्यक्त केली आहे, याचा उल्लेख याठिकाणी अप्रस्तुत ठरू नये.
२००१ साली एफसीआयच्या गोदामात धान्याची किती पोती होती आणि २०१२ सालअखेर किती पोती होती, हे धान्य किती टन होते, कोणत्या प्रकारचे होते आणि त्याची किंमत काय होती, ही माहिती अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकार कायद्याखाली विचारली होती. २००१ सालचा रेकॉर्ड पूर्व क्षेत्रीय व्यवस्थापकांनी पाठवल्याने तो रेकॉर्ड रूममध्ये उपलब्ध नाही, तर गव्हाची माहितीही उपलब्ध नाही असे या कार्यालयाने सांगितले. ३० डिसेंबर २०१२ रोजी ‘अ’ दर्जाचा २० हजार ९३३ मेट्रिक टन तांदूळ येथे होता व त्याची किंमत क्विंटलला २०९० रुपये असल्याची माहिती त्यांनी दिली.
१ जानेवारी ते ३० डिसेंबर २०१२ या कालावधीत किती धान्य उंदीर, घुशी व इतर कारणांमुळे खराब झाले किंवा वाया गेले, या विचारणेच्या उत्तरात ‘या काळात धान्याचे कुठलेही नुकसान झाले नाही’, असे एफसीआयने म्हटले आहे. यापैकी काही धान्य उघडय़ावर ठेवलेले होते, याचा उल्लेख वर आलाच आहे. दोन-तीन पोती धान्य उंदीर आणि घुशींपासून वाचवण्याची धडपड करणाऱ्या सामान्य नागरिकांसाठी, हजारो मेट्रिक टन धान्य या प्राण्यांपासून यशस्वीरित्या वाचवणाऱ्या एफसीआयने ‘मार्गदर्शन वर्ग’ सुरू करावे, असे यावरून नक्कीच वाटते.
हजारो टन धान्याचा साठा सांभाळण्यासाठी या कार्यालयात २००१ साली ४१३ कर्मचारी होते, तर २०१२ सालाअखेर ही संख्या वाढण्याऐवजी कमी होऊन २३५ झाली, ही माहितीही या निमित्ताने मिळाली आहे. भ्रष्टाचार आणि धान्याची हेराफेरी केल्याबद्दल १ जानेवारी २०१० ते ३० नोव्हेंबर २०१२ या कालावधीत किती कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली, या प्रश्नाच्या उत्तरात अशा एका कर्मचाऱ्यावर कारवाई झाल्याचे या कार्यालयाने सांगितले आहे. मात्र या कालावधीनंतर, म्हणजे गेल्या महिनाभरातच या कार्यालयातील तीन कर्मचारी पोलिसांच्या जाळ्यात सापडले, हे उल्लेखनीय. एफसीआयच्या गोदामातील सडलेल्या धान्याची विल्हेवाट कशी लावली जाते, असाही प्रश्न कोलारकर यांनी विचारला होता. त्यावर, धान्य महामंडळाकडे नोंदणी झालेल्या कंत्राटदाराला निविदा प्रक्रियेत सहभागी होऊन हे काम दिले जाते, असे महामंडळाने कळवले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा