सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन यशस्वी व्हावे यादृष्टिने महापालिका, जिल्हा प्रशासनाकडून विविध प्रयत्न करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांनी ‘कुंभथॉन’ शी हातमिळवणी करत कुंभमेळ्यातील विविध समस्यांवर उपयोगी पडणारे मोबाईल तसेच ‘वेब अ‍ॅप’ बनविण्याचा निर्णय पालिका कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला.
बैठकीस मनपा आयुक्त डॉ. प्रविण गेडाम, मनपा संगणक विभाग प्रमुख मगर, शहर अभियंता यु. बी पवार आदी उपस्थित होते. ‘नोकरीसाठी शिक्षण’ ही विद्यार्थ्यांची पारंपरिक ठराविक ढाचातील मानसिकता बदलवून त्यांना उद्योजकतेसाठी तयार करणे हे मुळीच सोपे काम नाही. परंतु कुंभमेळा ही एक व्यावसायिक संधी असल्याचा संदेश प्रत्यक्ष कृतितून देण्यात ‘कुंभथॉन’ यशस्वी झाले आहे. दर बारा वर्षांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे भरणाऱ्या कुंभमेळ्यात शहराची लोकसंख्या एकदम दहा ते पंधरा पटीने वाढते. अशावेळी शहरातील मूलभूत सोयी-सुविधांची कमतरता जाणवते. संसाधनाचा तुटवडा दिसून येतो. संवाद, आरोग्याचे प्रश्न, दळणवळण, रहदारीचे गणित कोलमडते. स्वच्छता, गर्दी, आपत्ती, सुरक्षाविषयक संकट अशा विविध समस्या निर्माण होतात. शहराच्या मध्यवस्तीत भरणाऱ्या कुंभमेळ्यामुळे स्थानिक नागरिकांच्या जीवनमानावरही परिणाम होतो. हे जीवनमान अबाधित राखत कुंभमेळा यशस्वीपणे पार पाडणे म्हणजे प्रशासनाची मोठी कसरतच.
या पाश्र्वभूमीवर तंत्रज्ञानाची मदत घेत नाशिकमधील विविध शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी, व्यावसायिक व उद्योजक प्रयत्न करत असून गेल्या एक-दीड वर्षांपासून सुरू असलेल्या ‘कुंभथॉन’च्या कामगिरीने स्थानिक प्रशासनही प्रभावित झाले आहे. विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी वेळोवेळी तरुणांना मार्गदर्शन केल्याने प्रशासनाच्या गरजा समजून घेणे अधिक सोपे झाले. त्यातच एमआयटी सारख्या अव्वल विद्यापीठाचे मार्गदर्शनही ‘कुंभथॉन’ गटांना सातत्याने मिळत आहे.
सुमारे दीड वर्षांपासून कार्यरत ‘कुंभथॉन’चे यश आता कुठे दृष्टिपथास येण्यास सुरूवात झाली आहे. नोकरीसाठी अहवाल तयार करण्याऐवजी नाशिकच्या विद्यार्थ्यांनी प्रशासनाला कुंभमेळा नियोजनाचे प्रस्ताव दिले आणि स्वत:बरोबरच इतरांसाठीही व्यावसायिक संधी निर्माण करत लोकोपयोगी तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम हाती घेतले. यातूनच त्यांच्यातील उद्योजकता वाढीस लागून भविष्यात नाशिक शहरातून मोठय़ा सॉफ्टवेअर कंपन्या उभ्या राहतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा