पोलीस दलातील ठळक घडामोडी संकेतस्थळावर टाकण्याच्या बाबतीत मराठवाडय़ातील निम्म्या जिल्हय़ांमध्ये सजगता, तर उर्वरित जिल्हय़ांमध्ये अनास्था असल्याचे दिसते. नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्हय़ांमध्ये पोलीस संकेतस्थळ अपडेट केले जात असले, तरी बीड, परभणी, हिंगोली व औरंगाबाद ग्रामीण जिल्हय़ांचे पोलीस दल मात्र गेल्या अडीच-तीन वर्षांत अपडेट केले गेलेले नाही.
बीड पोलीस दलाची वृत्तटिप्पणी शोधण्याचा प्रयत्न केला असता १४ जून २०११पासून दैनंदिनी अपडेट केली नसल्याचे दिसून येते. औरंगाबाद ग्रामीणची वृत्तटिप्पणी ४ ऑक्टोबर २०१०, िहगोली २४ ऑक्टोबर २०११, तर परभणीची ३ मार्च २०१० अशी दाखवण्यात येते. नांदेड, उस्मानाबाद, लातूर येथील पोलीस खाते मात्र या बाबतीत अपडेट आहे. खून, दरोडा, बलात्कार, तसेच छेडछाडीला कंटाळून आत्महत्या आदी विविध स्वरूपाचे गुन्हे दररोज कुठे ना कुठे सर्रास घडत असतात. याची माहिती संकेतस्थळावर अपडेट होणे आवश्यक असते. परंतु बीड, औरंगाबाद ग्रामीण, परभणी, िहगोलीच्या पोलीस दलास मात्र अपडेट करण्याचा विसर पडल्याचे दिसून येते. राज्य सरकारच्या पोलीस संकेतस्थळावर दररोजची वृत्तटिप्पणी अपलोड होणे आवश्यक असताना प्रत्यक्षात याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
वृत्तटिप्पणी अपलोड केली जात नसल्यामुळे सर्वसामान्यांना, तसेच प्रामुख्याने वरिष्ठ प्रशासनाला याची माहिती मिळू शकत नाही. गुन्हेगारीचा दैनंदिन आलेख दडवण्यासाठी तर ही वृत्तटिप्पणी अपडेट केली जात नाही ना, असा प्रश्न विचारला जात आहे. विशेषत: महिला अत्याचारांच्या बाबतीत ही माहिती अपडेट होणे खूप आवश्यक आहे. कारण याची दखल महिला आयोगापर्यंत जाऊ शकते.