आपल्या मुला-मुलींच्या लग्नाची चिंता कमी करणे सर्वस्वीपणे पालकांच्याच हाती आहे, असे प्रतिपादन ‘अनुरुप विवाह संस्थे’च्या गौरी कानिटकर यांनी केले.
‘लोकसत्ता जीवनसाथी’ आणि ‘अनुरूप विवाह संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली येथे ‘लग्न मुला-मुलींची चिंता पालकांची’ या मुक्तचच्रेच्या कार्यक्रमात बोलताना त्या बोलत होत्या. कार्यक्रमास उपस्थित प्रेक्षकांनी आपल्या मुला-मुलींच्या लग्नात येणाऱ्या अडचणी आणि त्यातून निर्माण झालेल्या चिंता मोकळेपणाने व्यक्त केल्या.
गौरी कानिटकर म्हणाल्या की, लग्नाबद्दल घरात पालक आणि मुले-मुली यांच्यात सुसंवाद घडत नाही. पालक आपल्या लग्नाच्या काळाप्रमाणे विचार करतात. यात अनेक प्रश्नांचे मूळ दडलेले आहे. आजच्या मुलीना सर्व बाबतीत नवऱ्याने समानता दाखवावी असा हट्ट असतो. परंतु आपला पती  शिक्षण, उंची, वय आणि पगाराने आपल्यापेक्षा वरचढ असावा अशी त्यांची अपेक्षा असते. ही विसंगती पती-पत्नी विसंवादाच्या मुळाशी असल्याचे त्यांनी नमूद केले. मुला-मुलीना विश्वासात घ्या, त्यांच्या मतांची कदर करा आणि स्थळे शोधण्याच्या प्रक्रियेत त्यांना सामावून घ्या, असा सल्ला त्यांनी त्यांनी दिला.
‘आमच्या मुलीला आम्ही सर्वोत्तम असे शिक्षण दिले. तिला उत्तम नोकरी आहे. परंतु समाजात शोधूनही उच्चशिक्षित मुले सापडत नाहीत, आणि मिळाली तर माझ्या मुलीला पसंत पडत नाहीत. मुलीचे वय वाढत चालले आहे. त्यामुळे काय करायचे ते समजत नाही’, अशी व्यथा एका पालकाने यावेळी व्यक्त केली.‘आसपास घटस्फोटाचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे मुलीला पती कसा मिळेल याची चिंता वाटते’, असेही एका पालकाने सांगितले. मुलीला सांगून आलेल्या मुलाची माहिती कशी काढायची?, यासाठी गुप्तचर संस्थांची मदत घ्यावी का? असे प्रश्न उपस्थित केले. काही पालक तर प्रचंड संतप्त झाले होते. मुला-मुलींची लग्ने व्हावीत ही पालकांची गरज आहे, असे आजच्या मुला-मुलींच्या वागण्यातून भासते. त्यांना लग्नाबद्दल काहीच वाटत नाही. त्याचा पालकांना विलक्षण त्रास होतो, अशी व्यथा काही पालकांनी यावेळी मांडली. दरम्यान, काही पालक विवाहाच्या प्रस्तावाना उत्तरे पाठवण्याचे सौजन्य दाखवीत नाहीत. लग्न ठरले तरी विवाह संथाना कळवत नाहीत, अशी तक्रार पालकांनी केली. पालकांच्या प्रश्नांना अनुरूप विवाह संस्थेच्या गौरी आणि महेंद्र कानिटकर यांनी उत्तरे दिली. महेंद्र कानिटकर म्हणाले की, ‘काळानुरुप जुळवून घेण्याशिवाय पालकांना पर्याय नाही. सासू-सासरे होण्यासाठी त्यांना मानसिक तयारी करावी लागणार आहे. स्वातंत्र्य गमवावे लागू नये यासाठी मुलीना एकत्र कुटुंब नको असते. ही बाब लक्षात घेऊन सुनांना स्वातंत्र्य द्यावे आणि आपल्या स्वतचा हेका सोडवा.आपल्या मुला-मुलींचे संसार सुखाचे होण्यासाठी त्यांनी मदत मागितली तरच करावी, असेही ते म्हणाले.  आपले प्रश्न सोडविण्यासाठी आपणच प्रयत्न करायला हवेत, असे कार्यक्रमाचा समारोप करताना पत्रकार रविप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले. दोन तासाहून अधिक काळ चाललेल्या या कार्यक्रमात प्रेक्षकांचा सहभाग उत्तम होता.   

Story img Loader