दुकानदारांच्या वजन काटय़ाची पडताळणी करून योग्यता प्रमाणपत्र देण्यासाठी १० हजार रूपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आलेल्या दिंडोरी तालुक्यातील वणी येथील वजनमापे वैधमापनशास्त्रक निरीक्षक सतीश पुरूषोत्तम वानखेडे यास लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार सहा महिने सक्तमजुरी आणि दोन हजार रूपये दंड सुनावण्यात आला आहे.
वणी येथील दुकानदारांच्या वजन काटय़ाची पडताळणी करून योग्यता प्रमाणपत्र मिळावे म्हणून तक्रारदाराने ८१ प्रकरणांचे प्रस्ताव वजनमापे वैधमापनशास्त्रक कार्यालयाकडे जमा केले होते. त्याप्रमाणे वजनकाटय़ांची पडताळणी करून योग्यता प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यालयातील निरीक्षक सतीश वानखेडे याने १० हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाशी संपर्क साधल्यावर सापळा रचण्यात आला. २० मे २००९ रोजी वानखेडे यास तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्य़ाचा तपास पूर्ण झाल्यानंतर नाशिकच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा निकाल लागून वानखेडे यास शिक्षा सुनावण्यात आली. या खटल्याचे कामकाज सरकार पक्षातर्फे सुधीर कोतवाल यांनी पाहिले.

Story img Loader