एका विवाहित तरुणीचे फेसबुकवर एका तरुणाशी प्रेम जुळले. परंतु नंतर त्यांच्यात वितुष्ट आले आणि त्याने लग्नास नकार दिला. त्यामुळे ही तरुणी दररोज एसएमएस हेल्पलाइनवर मेसेज पाठवून तक्रार करत होती. तिला पोलिसांनी वारंवार समजावलं पण तिचे मेसेजेस काही थांबत नव्हते. दररोज ती दहा ते पंधरा मेसेजेस पाठवत होती. अखेर पोलिसांनी तिच्या कुटुंबियांनी सांगितलं आणि तिच्या आईने तिला मुंबईतून गोव्याला नेलं आणि या त्रासातून पोलिसांना मुक्तता मिळाली.
ल्ल एक वयोवृद्ध इसम अजूनही दररोज मेसेज पाठवत असतात. त्यांना धंद्यात आर्थिक
नुकसान झाल्याने ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळे चित्रविचित्र मेसेजेस चे आजही पाठवितात. कधी एखादी योजना सांगतात, कधी सरकारला शिव्या घालतात, तर आत्महत्या केल्यास पोलीस जबाबदार राहतील असा धमकीवजा मेसेजही पाठवतात. वारंवार समज देऊनही त्यांचे हे एसएमएस उद्योग थांबत नाहीत. आता पोलिसांनी त्यांच्या मेसेजवर दुर्लक्ष करण्यास सुरवात केली आहे.
ही मनोगते नसून पोलिसांच्या एसएमएस सेवेशी संबंधित घडलेल्या खऱ्या घटना आहेत. पोलिसांचा अत्यावश्यक सेवेचा नंबर असो किंवा एसएमएस सेवा असो नागरिक मात्र त्याच्याकडे निव्वळ मनोरंजन म्हणून पाहातात की काय, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. ‘माझा प्रियकर माझ्याशी लग्न करत नाही’, ‘एलआयसी पॉलिसी काढा’, ‘चुनिए अपने मनपसंद गाने’, ‘सरकार नालायक आहे..’ या तक्रारी आणि जाहिरातींनी सध्या मुंबई पोलीस त्रस्त झाले आहेत. कारण अशा स्वरुपाच्या तक्रारी आणि जाहिराती पोलिसांच्या एसएमसएस हेल्पलाईनवर दररोज येत आहेत. वारंवार समज देऊनही लोकं अशा प्रकारचे बिनकामाचे मेसेजेस पाठवून एका चांगल्या सेवेचा बोजवारा उडवित आहेत.
नागरिकांना संकटकाळी मदत व्हावी यासाठी मुंबई पोलिसांचा १०० हा हेल्पलाईन क्रमांक आहे. परंतु मोबाईलच्या काळात नागरिकांच्या सोयीसाठी मुंबई पोलिसांनी ८ मे २०११ रोजी एसएमएस सेवा सुरू केली. या सेवेचा उद्देश नागरिकांना आपल्या तक्रारी लिखित स्वरूपात कधीही पाठवता याव्यात, त्याचा पुरावा तक्रारदार आणि पोलिसांकडे रहावा आणि त्यावर जलद कारवाई करणे सोपे जावे हा आहे. ७७३८१३३१३३, ७७३८१४४१४४ या दोन क्रमांकावर नागरिकांनी आपल्या तक्रारी, समस्या एसएमएस केल्यास त्याची तात्काळ दखल घेऊन कारवाई केली जाते. त्यासाठी सात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. पंरतु ही सेवा सुरू केल्यापासून विनाकामाच्या मेसेजेसचा भरणा मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. दिवसाला या एसएमएस हेल्पलाईनवर ३० ते ३५ मेसेजेस येतात. त्यातील ८० टक्क्यांहून अधिक हे टाईमपास या प्रकारात मोडणारे असतात. कंपन्या आपल्या उत्पादनांच्या जाहिराती एकाच वेळी शेकडो जणांना (बल्क मेसेज) पाठवत असतात. त्या जाहिराती येत असतात. कधी कुणी एलआयसी एजंट विमा पॉलिसी काढण्याचा मेसेज पाठवतो, तर कुणी घरगुती समस्या या मेसेज करुन सांगत असतात. अनेक तक्रारी या बोगस असतात, असे नंतर तास केल्यावर समजते.
मुंबई पोलिसांच्या हेल्पलाईनवर विचित्र तक्रारींचा पाऊस
एका विवाहित तरुणीचे फेसबुकवर एका तरुणाशी प्रेम जुळले. परंतु नंतर त्यांच्यात वितुष्ट आले आणि त्याने लग्नास नकार दिला. त्यामुळे ही तरुणी दररोज एसएमएस हेल्पलाइनवर मेसेज पाठवून तक्रार करत होती.
First published on: 12-03-2014 at 06:43 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Weird complaints on mumbai police helpline