मराठवाडय़ात गणरायाचे मोठय़ा थाटामाटात आगमन झाले. हलक्या पावसाच्या शिडकाव्याने परतीचा पाऊस येतो आहे, हा संदेश बाप्पा घेऊन आला. शहरात सकाळच्या वेळी घरोघरी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. श्रींच्या आगमनाची वेगळीच लगबग प्रत्येकाकडे सुरू होती. गणपतीचा मखर, आरास सकाळच्या सत्रात झाल्यानंतर दुपारी सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आणि ढोलताशाच्या गजरात ‘गणपतीबाप्पा मोरया’चा जयघोष झाला.
शहरातील मानाच्या संस्थान गणपतीची यथासांग पूजा करण्यात आली. दुपारनंतर काही रस्त्यांवरून चालणेही अवघड झाले होते. श्रींच्या आगमनासाठी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. कोणाच्या डोक्यावर रिबीन बांधली होती, तर कोणाच्या हातात ढोल-ताशे होते. गणेशमूर्तीच्या खरेदीसाठीही झुंबड उडाली. सेव्हन हिल ते गजानन मंदिर परिसरात वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना बरीच कसरत करावी लागली. शहरात सुमारे १ हजार १०० सार्वजनिक गणपतीची स्थापना होईल, असा पोलीस दलाचा अंदाज आहे. दुपारी साडेचारनंतर प्रतिष्ठापना होत असल्याने या नोंदी रात्री नऊच्या सुमारास पूर्ण होतील, असे पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी सांगितले. गणेशोत्सवादरम्यान अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. विशेषत: गर्दीच्या ठिकाणी मुलींची छेडछाड होऊ नये, याची पोलिसांनी विशेष काळजी घेतली.
सकाळी पावसाची एक सर येऊन गेली आणि बाप्पाच्या आगमनाला पाऊस येणार, असे वातावरण निर्माण झाले. दुपारी हलकासा शिडकावा झाला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवाच जोश संचारला. वाजत-गाजत, गुलाल उधळत श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. या वर्षी पर्यावरणपूरक घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना करण्याचे प्रमाणही वाढले आहे. शहरात काही ठिकाणी अथर्वशीर्ष व गणपतीस्तोत्राच्या पठणाचेही कार्यक्रम आयोजित केले आहेत. सार्वजनिक गणेश मंडळांनी विविध स्पर्धाचेही आयोजन केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर नेते आणि पुढारीही या महोत्सवात आवर्जून सहभागी होत आहेत. गेल्या वर्षभरात मराठवाडय़ात मोठा पाऊस झाला नव्हता. या पावसाळ्यात तसा पाऊस कमीच आहे. बाप्पाने परतीचा पाऊस घेऊन यावा, अशी आर्जव सर्वत्र केली जात होती. गणेशचतुर्थीच्या दिवशी मराठवाडय़ात सर्वत्र थोडा का असेना पाऊस येऊन गेला. नांदेड आणि हिंगोली या दोन जिल्ह्य़ांत मोठा पाऊस झाला. तर औरंगाबाद, उस्मानाबाद, जालना, लातूर आणि बीड येथे पावसाने हजेरी लावली.
लातूरला गणरायाचे उत्साहात स्वागत
वार्ताहर, लातूर
ढोल, ताशाच्या गजरात लातूरकरांनी गणरायाचे पारंपरिक उत्साहात स्वागत केले. गेल्या १५ दिवसांपासून गायब झालेल्या वरुणराजानेही हजेरी लावून तरुणांचा उत्साह द्विगुणित केला.
पहाटेला स्नान करून लातूरकर आधीच खरेदी करून ठेवलेली श्रींची मूर्ती आणण्यास घराबाहेर पडले होते. गणरायाच्या आगमनानिमित्त लातूरची बाजारपेठ गर्दीने फुलली होती. जागोजागी गणेशाचे स्टॉल लागले होते. गंजगोलाई, सुभाष चौक, शिवाजी चौक, औसा रस्ता, बार्शी रस्ता, अंबाजोगाई रस्ता, नांदेड रस्ता, मार्केट यार्ड, कव्हा नाका परिसरात मोठय़ा संख्येने मूर्तीचे स्टॉल थाटले होते. शहरात एक हजारापेक्षा अधिक स्टॉलवर गणेशमूर्ती विक्रीस उपलब्ध होत्या. २० रुपयांपासून ३० हजारांपर्यंत त्यांच्या किमती होत्या. स्थानिक मूर्तिकारांसह उस्मानाबाद, मुंबई, पुणे, सांगली, पेण येथूनही गणेशमूर्ती लातूरच्या बाजारपेठेत दाखल झाल्या होत्या.
मूर्तीसोबतच स्वागतासाठी लागणाऱ्या साहित्याची रेलचेल मोठय़ा प्रमाणात दिसून येत होती. या साहित्याचेही छोटे-मोठे गाडे उभे होते. या गाडय़ांवर आवळा, सीताफळ, केळी, काकडी, पेरू, मका, दुर्वा, आगर्डा आदींसह सर्व साहित्य ३० रुपयात विकले जात होते. किराणा दुकानात खारीक, खोबरे, सुपारी, बदाम, खडीसाखर, कापूर, गुलाल हे साहित्य खरेदी केले जात होते. सुभाष चौकातील सुभाष हलवाईच्या दुकानात मोदकाच्या आकारातील पेढे खरेदीसाठी ग्राहकांनी रांगा लावल्या होत्या.
शहरातील आजोबा गणेश मंडळ, अमर गणेश मंडळ, जयिहद गणेश मंडळ, नंदी गणेश मंडळ, लातूरचा राजा गणेश मंडळ, लातूरचा महाराजा गणेश मंडळ, शारदा गणेश मंडळ आदींसह शहरातील अनेक गणेश मंडळांनी वाजतगाजत श्रींची स्थापना केली. यावेळी तरुणाईचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. वाहतूक मार्गातही बदल केला होता. दुपारी १२ ते रात्री १० पर्यंत मिरवणूक असल्याने वाहतूक पीव्हीआर चौकातून बायपासने औसा टी पॉईंट, राजीव गांधी चौक, शिवाजी चौक, एस. टी. डेपो या मार्गाचा वापर करण्यात येत होता. औसा रोडने शहरात येणाऱ्या एस. टी. बसेसला शिवाजी चौकातच थांबा होता. त्यामुळे श्रींची मिरवणूक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
मोरयाच्या गजरात प्रतिष्ठापना
वार्ताहर, नांदेड
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या गजरात शहर व जिल्ह्यात मोठय़ा उत्साहात श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. बाप्पांसोबत पावसाचेही दमदार आगमन झाले. बालगोपाळांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण आतूरतेने वाट बघतात त्या उत्सवाला सोमवारी उत्साहात प्रारंभ झाला. गणेशमूर्ती, पूजेचे व सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी सर्वच बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या होत्या. श्रीनगर, तरोडा नाका, वजिराबाद, शिवाजीनगर, जुना मोंढा, वर्कशॉप आदी भागातील बाजारपेठांमध्ये सकाळपासूनच गणेशमूर्ती व साहित्य खरेदीसाठी लोकांनी गर्दी केली होती. गणेशमूर्ती, तसेच साहित्याच्या दरात वाढ झाली असली तरी त्याचा खरेदी-विक्रीवर कोणताही परिणाम जाणवला नाही. महागाईचे सावट असतानाही नागरिकांचा विशेषत तरुणांचा उत्साह लक्षणीय होता. लालबागचा राजा, दगडुशेठ हलवाई यासह अन्य पारंपरिक मूर्तीना मोठी मागणी होती. थर्माकोलची मंदिरे, विजेच्या माळा, मखर, तसेच विविध रंग व आकाराचे प्लॅस्टिकचे मखमली हार यंदाचे आकर्षण ठरले. जिल्ह्यात सुमारे १ हजार ८०० सार्वजनिक मंडळींनी श्रींची प्रतिष्ठापना केली आहे. पोलीस दफ्तरी हा आकडा असला, तरी त्यापेक्षा अधिक मंडळांच्या वतीने हा उत्सव साजरा केला जातो.
तब्बल २५० अधिकारी व सुमारे ४ हजार पोलीस कर्मचारी १० दिवस डोळ्यात तेल टाकून रात्रंदिवस बंदोबस्त करणार आहेत. गृहरक्षक दलाचे सुमारे १ हजार २०० जवान बंदोबस्तकामी पोलिसांना मदत करणार आहेत. याशिवाय राज्य राखीव दलाच्या तुकडय़ाही अतिसंवेदनशील भागात तळ ठोकून असणार आहेत. गणेशोत्सवाला गालबोट लागू नये, यासाठी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
जालन्यात भक्तिभावाने स्वागत
वार्ताहर, जालना
जालना शहर व जिल्ह्य़ात श्रींची प्रतिष्ठापना उत्साहात करण्यात आली. दिवसभर श्रींची मूर्ती घेऊन जाणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुका प्रमुख रस्त्यांवर दिसत होत्या. मागील गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट होते. यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे गणेशोत्सवात उत्साही वातावरण आहे. जिल्ह्य़ातील राजूर येथील प्रसिद्ध गणपती, तसेच माळाचा गणपती, जुना जालना भागातील प्रसिद्ध गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होती. यावर्षी बाहेरून आलेल्या गणेशमूर्तीसोबतच स्थानिक कलाकारांनी तयार केलेल्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना अनेक मंडळांनी केली.
बीडला वरुणराजासह स्वागत
वार्ताहर, बीड
ढोल ताशांचा गजर व गुलालाची उधळण अशा वातावरणात गणरायाचे आगमन होत असतानाच रात्री थोडा व सकाळी काहीशा हलक्या प्रमाणात वरुणराजाचेही पुनरागमन झाल्याने गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण आले.
शहरासह जिल्हय़ात सकाळपासूनच गणेशभक्तांनी ढोल, ताशांच्या गजरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी गुलालाची उधळण करीत मिरवणुका काढल्या. गुलालाची उधळण करीत गणेशाला घेऊन निघालेल्या भक्तांमध्ये वरुणराजाच्या आगमनाने उत्साहाला उधाण आले. जागोजागी गुलालाची उधळण करीत गणेशभक्तांनी मोठय़ा भक्तिभावाने मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. सिद्धीविनायक संकुलात गणेशमूर्तीची दुकाने एकत्र असल्यामुळे परिसरात गणेशभक्तांची गर्दी झाली होती.
दुष्काळाचे सावट दूर करण्याचे बाप्पांना साकडे
उस्मानाबाद
तीन आठवडय़ांपासून दडी मारलेल्या पावसाला घेऊनच गणपतीबाप्पांचे आगमन झाले. गणेशमूर्तीची सवाद्य मिरवणूक काढत विविध मंडळांनी उत्साहात स्थापना केली. ढोलताशे, गुलालांची उधळण, कार्यकर्त्यांचा जल्लोष हे चित्र जिल्ह्य़ात सर्वत्र होते.
मागील सलग दोन वर्षांपासून अत्यल्प पावसामुळे गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट होते. यंदा समाधानकारक पाऊस होईल, अशी अपेक्षा नागरिक बाळगून होते. परंतु यंदाही जिल्ह्यात अजून दमदार स्वरूपाचा पाऊस झाला नाही. परिणामी गणेशोत्सवावर दुष्काळाची छाया आहे. या पाश्र्वभूमीवर गणेश मंडळांचे पदाधिकारी, तसेच कार्यकर्त्यांचा उत्साह बाप्पांच्या आगमनाच्या पूर्वसंध्येला ओसंडून वाहात होता. उस्मानाबाद शहरातील प्रमुख मूíतकारांनी तयार केलेल्या बाप्पांच्या मूर्ती खरेदी करण्यास कार्यकर्त्यांनी दिवसभर मोठी गर्दी केली होती. शहरातील मूíतकारांनी यंदा उत्सवासाठी सात फुटांपर्यंत मूर्ती तयार केल्या आहेत. बदलत्या काळानुसार संगणक, माऊस हाताळणारे गणपती बाप्पा मूíतकारांनी साकारले असून, नवीन संकल्पनेनुसार दाखल झालेल्या मूर्ती घेण्याकडे मंडळांचा कल दिसून येत आहे. ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या गजरात कार्यकत्रे गणरायांना वाहनांमधून घेऊन जात होते.
गणेशोत्सवासाठी जिल्हाभर विविध मंडळांनी जय्यत तयारी केली. ग्रामीण भागात मात्र पावसाअभावी उत्सवावर दुष्काळाचे सावट आहे. संकटात सापडलेल्या जनतेला भरपूर पाऊस दे व संकट दूर कर, असे साकडे भक्तांकडून गणरायांना घातले जात आहे.