गणरायाचा जयघोष, ढोल-ताश्यांचा गजर, आकर्षक रोषणाई अशा उत्साही वातावरणात करवीर नगरीत लाडक्या गणरायाची विधीवत प्रतिष्ठापना सोमवारी करण्यात आली. महिनाभर दडी मारलेल्या वरूणराजाने मंगलमूर्तीच्या स्वागतासाठी सायंकाळी हजेरी लावल्याने गणेशोत्सवात चैतन्याची बरसात झाली. बहुतांशी मंडळांनी पारंपरिक वाद्यांच्या निनादात मिरवणुका काढल्या तरी डॉल्बीचा दणदणाट ऐकावयास मिळाला. सकाळपासून श्री मूर्ती आणण्यासाठी बाजारपेठेत, कुंभार गल्लीत भाविकांची झुंबड उडाली होती. सायंकाळी सार्वजनिक तरूण मंडळे, तालीम मंडळे यांच्या मिरवणुका उत्साही वातावरणात निघाल्या होत्या.
गणरायाच्या आगमनासाठी गेल्या काही दिवसांपासून करवीर नगरीत जोरदार तयारी सुरू होती. काल काही मंडळांनी गणेशाची प्रतिष्ठापना केली होती. तथापि अनेकांनी आज गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर श्रीची प्रतिष्ठापना करण्यास प्राधान्य दिले. त्यासाठी मुहुर्ताचा आधारही घेण्यात आला. सकाळी साडेआठपूर्वी प्रतिष्ठापना करण्यास शुभ मुहूर्त असल्याचे अभ्यासकांनी सांगितले होते. त्यामुळे सोमवारी भल्या सकाळी गंगावेश, शाहूपुरी येथील कुंभार गल्लीमध्ये तसेच श्री मूर्ती विक्रीस ठेवलेल्या महाव्दार रोड, पापाची तिकटी, शुक्रवार पेठ, महापालिका चौक, बापट कँम्प, जोतिबा रोड येथे गणेश भक्तांनी हजेरी लावली होती.
गणपती बाप्पा मोरयाचा गजर करीत श्रीच्या मूर्ती फटाक्याची आतषबाजी करीत घरोघरी नेण्यात आल्या. मुहुर्ताचा वेळ साधण्याची लगबग प्रकर्षांने जाणवत होती. मंगल आरती, मंत्रपुष्प, प्रार्थना यामुळे संपूर्ण शहरभर धार्मिक वातावरण जाणवत होते. सार्वजनिक मंडळे, तालीम मंडळे यांच्या मिरवणुका सायंकाळी निघाल्या. याचवेळी पावसाने हजेरी लावल्याने कार्यकर्त्यांची धांदल उडाली. काल रात्रीही पावसाने हजेरी लावल्याने कार्यकर्ते आज तयारीत होते. त्यांनी पावसामध्ये श्री मूर्ती भिजणार नाहीत, याची दक्षता घेतली होती. मंडळाचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने मिरवणुकांमध्ये उतरले होते. त्यामध्ये शालेय मुलांचा समावेशही मोठय़ा संख्येने होता.
प्रत्येक मंडळांचे वेगवेगळ्या रंगाचे ध्वज ठरलेले आहेत ते नाचवत आणि मोरया, मोरया गजर करीत कार्यकर्ते उत्साहाने मिरवणुकीत सहभागी झाले होते. श्री मूर्तीची अत्याकर्षक सजावट केल्याने आणि त्याला नेत्रदीपक रोषणाईची जोड दिल्याने रात्री श्रीचे लावण्य आणखीनच खुलले होते. झांजपथक, बेंजो या वाद्यांना अनेक मंडळांनी प्राधान्य दिले होते. पोलिसांनी डॉल्बीचा वापर केल्यास कारवाई करण्याचे स्पष्टपणे सूतोवाच केले होते. तरीही काही मंडळांनी डॉल्बीचा दणदणाट सुरूच ठेवल्याचे दिसले.
शिवाजी चौकातील २१ फुटी महागणपती परंपरेप्रमाणे वाजत गाजत आणला. या मंडळाने यंदावातानुकूलित मंडप ठेवून वेगळे वैशिष्टय़ जपले आहे. जुना बुधवार पेठ, बालगोपाल, अवचित पीर, खंडोबा, सुब्रराव गवळी या तालीम मंडळांच्या मिरवणुका लक्षवेधी ठरल्या. राजारामपुरीतील शाहूनगर मंडळाचा फोल्डींगचा गणपती सर्वाचे लक्ष वेधून घेणारा होता.
भारनियमन रद्दचा बोजवारा
गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्थीपर्यंत राज्यातील भारनियमन पूर्णपणे रद्द करण्यात येणार असल्याचे निवेदन ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी केले होते. मात्र गणेशोत्सवाच्या आजच्या पहिल्याच दिवशी शासनाच्या या घोषणेचा बोजवारा उडाला. सायंकाळी गणरायाच्या मिरवणुका उत्साहात सुरू असतांना तर काही ठिकाणी प्रतिष्ठापना सुरू असताना वीज गुल झाली. त्यामुळे गणेश भक्तांच्या आनंदावर विरजन पडले. तसेच शिंगणापूर जॅकवेलमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे, ई वॉर्ड, शिवाजी पार्क, राजारामपुरी, संभाजीनगर, सम्राटनगर, सायबर चौक, प्रतिभानगर आदी भागात पाण्याचा ठणाणा उडाला. घरोघरी गणेशाचे आगमन होत असतांना पाणी न मिळाल्याने दारोदारी भटकंती करावी लागली.
करवीरनगरीत गणेशाचे उत्साहात आगमन
गणरायाचा जयघोष, ढोल-ताश्यांचा गजर, आकर्षक रोषणाई अशा उत्साही वातावरणात करवीर नगरीत लाडक्या गणरायाची विधीवत प्रतिष्ठापना सोमवारी करण्यात आली. महिनाभर दडी मारलेल्या वरूणराजाने मंगलमूर्तीच्या स्वागतासाठी सायंकाळी हजेरी लावल्याने गणेशोत्सवात चैतन्याची बरसात झाली.
First published on: 10-09-2013 at 02:05 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Welcome to lord ganesha in enthusiasm in kolhapur