उत्साह मात्र फिफ्टी-फिफ्टी!
नववर्षांचे स्वागत आणि तरुणाईचा उत्साह.. हे समीकरण असले तरी हे वर्ष मात्र त्याला काहीसे अपवाद ठरले असून, कुठे उत्साह आणि कुठे उदासीनता असेच वातावरण पुण्यात पाहायला मिळाले. ३१ डिसेंबरला तरुणाईने फुलणाऱ्या जंगलीमहाराज आणि फग्र्युसन रस्त्यांवर नेहमीपेक्षा या वर्षी गर्दी कमी होती. मात्र, शहरातील काही मोठी हॉटेल्स, पबच्या पूर्वनियोजित पाटर्य़ाची बुकिंग फुल्ल झाली होती.
दिल्लीमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेचे सावट वर्षांअखेरच्या दिवशीही शहरात दिसून आले. दिवसभर अनेक ठिकाणी श्रद्धांजली सभा, निदर्शने झाली. त्यानंतर संध्याकाळी मात्र, रस्ते नववर्षांच्या स्वागतासाठी सज्ज होऊ लागले. रंगीबेरंगी फुगे, फुले, सान्ताक्लॉजच्या टोप्या विक्रेत्यांनी रस्ता फुलला होता. अनेक दुकानांसमोर सान्ताक्लॉज, सजवलेले ख्रिसमस ट्री येणाऱ्यांच्या स्वागतासाठी सज्ज होते. काही हॉटेल्स, पब, डिस्कोमध्ये नववर्षांच्या पूर्वसंध्येला पाटर्य़ाचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यामध्ये विविध ठिकाणी पन्नासहून अधिक पाटर्य़ाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, ३१ डिसेंबरच्या दिवशी गर्दीची सवय असणारी हॉटेल्स, रस्ते या ठिकाणी गर्दी तुलनेने कमी दिसत होती. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत या वर्षी गर्दी कमी असल्याचे फग्र्युसन रस्त्यावरील हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी सांगितले. शहरातील पूर्वनियोजित पाटर्य़ाचे बुकिंग फुल झाले होते. शहरातील काही मोठय़ा हॉटेल्ससमोर पार्टीसाठी तयार झालेल्या तरुणाईची गर्दी दिसून येत होती.
दारू नको.. दूध प्या
नव्या वर्षांचे स्वागत दारू पिऊन न करता दूध पिऊन करा, असा संदेश देणाऱ्या प्रबोधन फेऱ्यांचे काही संस्थांनी आयोजन केले होते. अनेक संस्था आणि संघटनांतर्फे शहरातील विविध ठिकाणी मोफत दुधाचे वाटपही करण्यात आले. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीसही सज्ज दिसत होते. शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये पोलिसांकडून दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या संशयित वाहन चालकांची तपासणी केली जात होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा